न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
रामदुर्ग तालुक्मयातील उदपुडी येथील श्री शिवसागर साखर कारखान्यामध्ये काम करत असलेल्या कामगारांना अचानकपणे कमी करण्यात आले. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा भविष्य निर्वाह निधी देण्यात आला नाही. त्यामुळे हे कामगार अडचणीत आले असून त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडून आम्हाला सर्व वेतन व भविष्य निर्वाह निधी द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
शिवसागर साखर कारखाना 2016 पासून बंद ठेवण्यात आला. 2017 ला या सर्व कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. कामगारांना कोणत्याच प्रकारचे वेतन किंवा इतर निधी देण्यात आला नाही. सध्या हा साखर कारखाना अरिहंत शुगर्स या कंपनीकडे चालविण्यासाठी देण्यात आला आहे. मात्र आमचे वेतन देण्यात आले नाही. तेव्हा आम्हाला तातडीने वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
कामवरून कमी केल्यानंतर त्या कामगारांनी जिल्हा कामगार न्यायालयामध्येही खटला दाखल केला आहे. लोकअदालतीमध्ये हा खटला वर्ग करण्यात आला. त्याठिकाणी कारखान्याच्या प्रशासनाने सदर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँकेने चालविण्यासाठी दिला आहे. त्यामुळे आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे सांगितले. तेव्हा आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.









