जि. पं. समोर धरणे : सेवेत कायम करण्याची मागणी
बेळगाव : समाज कल्याण खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या विविध वसतीगृहामध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, सरकारच्या सेवासुविधांचा लाभ करून घेण्यात यावा, समान काम समान वेतन आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जि. पं. कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. समाज कल्याण खात्याअंतर्गत येणाऱ्या मागासवर्गीय कल्याण खाते, परिशिष्ट जाती जमाती खाते, अल्पसंख्याक कल्याण खाते, कर्नाटक वसती शिक्षण संघाच्या अंतर्गत सुरू असलेले विद्यार्थी वसतीगृहामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून कंत्राटी तत्वावर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, जवान, नर्स, डी ग्रुप कर्मचारी कार्यरत आहेत. इतक्या वर्षापासून सदर कर्मचारी सेवा बजावत असतानाही यांना कोणत्याच सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. सदर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यात यावे. संबंधित खात्याकडून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वेतन जमा करण्यात यावे. कायद्याप्रमाणे आठवड्याची सुटी, सणाची सुटी, पीएफ, ग्रॅच्युएटी आदी सुविधा देण्यात याव्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान कामाला समान वेतन देण्यात यावे. कामाची वेळ निश्चित करण्यात यावी. समाज कल्याण खात्याकडून कर्मचारी कपातीचा आदेश मागे घेण्यात यावा. कामावर सुरक्षितता उपलब्ध करून द्यावी. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 रुपयांच्या बाँडवर हमीपत्र देण्याचा आदेश मागे घेण्यात यावा. बीसीएम वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून त्याप्रमाणे कर्मचारीही वाढ करावेत. अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांतर्फे जि. पं. कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. जि. पं. कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा येणार असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी करत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दलवाई, रेणुका नागनूरु, लकप्पा कांबळे, द्वारिका यद्दलपुडी आदी उपस्थित होते.









