पुणे / प्रतिनिधी :
राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार हा महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्मयामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार असल्याचे आश्वासन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
आंतरराष्ट्रीय कामगारदिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षकागृह, चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळय़ाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतिश देशमुख व अन्य उपस्थित होते.
डॉ. खाडे म्हणाले, कामगारांना हक्काच्या सर्व सोईसुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येईल. कामगारांना आरोग्यविषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्यात 6 मल्टीस्पेशालटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याचप्रमाणे प्रत्येक जिह्यात असे रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कामगारांचा अपघात झाल्यावर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी विमा कंपनीबाबत योजना तयार करण्यात येत आहे. सुरक्षा मंडळातील कर्मचारी, अर्धवेळ काम करणाऱया कामगाराला एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कामगारांना शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले असून, ही पुस्तिका सर्व तालुक्मयात पोहोचविण्यात यावी. कामगारांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देणार असून, याकरिता या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून सल्ला घेण्यात येईल. प्रामाणिकपणे काम करा, उद्योगवाढीसाठी प्रयत्न करा. उद्योग टिकला, तर कामगार टिकेल असा संदेश देत कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहनही डॉ. खाडे यांनी केले.








