रायबंदर येथे ‘स्मार्ट सिटी’चे काम सुरू असताना दुर्घटना
पणजी : पानवेल-रायबंदर येथील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या सिवरेज लाईनच्या कामाच्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली एक कामगार अडकून त्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी सकाळी घडली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम हे किती असुरक्षित परिस्थितीत चालू आहे, हे एका कामगाराचा जीव गेल्यावर उघड झाले आहे. मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव अंगत पंडित (वय 32 वर्षे) असे असून तो मूळ बिहार येथील आहे. घटनेबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अंगत याला बाहेर काढण्यात आले. अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी गणेश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास परब, लक्ष्मीकांत साळगावकर, दत्ता सिनारी, परेश गावस, विनायक उगवेकर व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अंगत याला गोमेकॉत दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंगत हा पाईप घालण्यासाठी खोदकाम केलेल्या जागेत उतरला होता. अचानक आत पाणी येऊ लागल्याने तो बाजूला सरकत होता, तोच दुसऱ्या बाजूने रस्ता खचला आणि मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर आला. त्यातच तो चिरडला गेला. तिथे असलेल्या लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही.
रस्त्यावर वाहनांची गर्दी
पानवेल येथे घडलेल्या घटनेमुळे त्या बाजूने येणारी-जाणारी वाहने अडकून पडली होती. नंतर सगळी वाहतूक ओल्ड गोवा बायपास मार्गाने वळविण्यात आली. वाहने अचानक वाढल्याने बायपास रस्त्यावरही वाहनांची गर्दी झाली, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. पणजीत येणाऱ्या लोकांना तब्बल दोन तास उशिरा यावे लागले. कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदार, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनी केली आहे.
आपण यापूर्वीच काळजी घेण्यास सूचविले होते
आपल्या प्रभाग क्र. 30 मध्ये स्मार्ट सिटीचे काम चालू असताना कामगाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेने धक्का बसला आहे. आपण संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती की, हा भाग मांडवीच्या काठाला लागून असल्याने भरतीच्यावेळी पाणी आत शिरते. त्याचबरोबर हल्लीच पावसाळा झाल्याने माती ठिसुळ होत असते, अशी माहिती नगरसेविका संड्रा मारिया दा कुन्हा यांनी दिली. सिवरेज वाहिनीचे काम ट्रेन्चलेस पद्धतीने करावे, खोदकाम करु नये, वाहतुकीस अडथळा येईल, तसेच लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे काम करु नका, वाहतूक पोलीस नेमावेत, दिशादर्शक फलक लावावेत अशा सूचनाही आपण स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. आमचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी याप्रकरणी आपणास पूर्ण सहकार्य दिले आहे, असेही त्या म्हणाल्या.









