मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : अखिल गोवा क्षत्रिय मराठा समाज वार्षिक गुणगौरव समारंभ
प्रतिनिधी /पर्वरी
आपणही समाजाला काही देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने काम केले पाहिजे. गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाची वास्तु जवळ जवळ पूर्ण होत असून उरलेल्या कामासाठी प्रत्येकाने सढळ हस्ते मदत करावी. ही वास्तु पूर्ण झाल्यावर पदाधिकाऱयानी समाजातिल हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण पूर्ण झाल्यावर परत करण्याच्या अटीवर आर्थिक मदत करण्याची योजना राबवावी तसेच राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळय़ा परीक्षासाठी अभ्यासवर्ग सुरू करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
येथील सुकूर पंचायत सभागृहात अखिल गोमंतक क्षत्रिय समाजाच्या वार्षिक गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार उल्हास तुयेकर, राजेश फळदेसाई, डॉ. चंद्रकांत शेटये, अध्यक्ष महेश गावकर व अन्य उपस्थित होते.
गोमंतक क्षत्रिय समाजाने गोव्याच्या इतिहासात मोलाचे काम केले आहे. त्यातील कुंकळीचा उठाव ही गोव्याची अस्मिता राखण्याची घटना आहे. त्या घटनेला माझ्या कार्यकिर्दीत ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक दिवस’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. ही माझ्या दृष्टीने फार अभिमानाची बाब आहे. तसेच समाजातील आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण आमच्याच सरकारने दिले आहे. आज त्याचा फायदा समाजातील अनेक लोक घेत आहेत. विद्यार्थ्यांनी गोव्यात नवीन सुरू झालेल्या राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स कॉलेज- केरी, राष्ट्रीय लॉ कॉलेज, राष्ट्रीय आयुष इन्स्टिटय़ूट-धारगळ, राष्ट्रीय इन्स्टिटूट ऑफ वॉटर स्पोर्ट-मिरामर अशा कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार उल्हास तुयेकर, राजेश फळदेसाई, डॉ. चंद्रकांत शेटये यांचीही भाषणे झाली. सुरुवातीला समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा गौरव मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उल्हास फळदेसाई यांचा ‘कृष्णा गावकर जीवन गौरव पुरस्कार’ देवून मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महेश गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर विजायकुमार कोप्रे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास समाजातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









