हलगा येथील शेतकऱ्यांचा पवित्रा : अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, लेखी आश्वासन देण्याची मागणी
बेळगाव : हलगा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यात आलेली असली तरी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे भरपाई मिळेपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे, काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हलगा येथील जमीन गमावलेले शेतकरी व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मनपा अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. अधिकाऱ्यांकडून जमीन संपादन करताना देण्यात आलेले आश्वासन पाळण्यात आलेले नाही. याबद्दल बैठकीत तक्रार केली.
दरम्यान, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन अधिकाऱ्यांच्या विलंब धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याने अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना मनपामध्ये नोकरी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. जमिनीचा एनए करून देण्याची हमी देण्यात आली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून याची पूर्तता करण्यात आलेली नाही. केवळ वेळ मारून नेत असल्याचे काम अधिकारी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याची दखल घेऊन मनपा अधिकाऱ्यांची चांगलीच झडती मंत्र्यांनी घेतली. दरम्यान, शेतकऱ्यांनी वाढीव भरपाई देण्यात यावी. तसेच ही भरपाई देण्यात आल्यानंतरच काम सुरू करण्यात यावे. अन्यथा काम सुरू करण्यात येऊ नये. अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासने दिली आहेत. आता आपण याला संमती देणार नसून लेखी आश्वासन देण्यात यावे, अशी मागणी केली. तर भरपाई दिल्याशिवाय काम सुरू करू नये. काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. त्यामुळे प्रशासन व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन भरपाई देण्याचे दिलेले आश्वासन व शेतकऱ्यांनी घेतलेला पवित्रा यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार भरपाई मिळणार का? हे पहावे लागणार आहे.
कवडीमोल भाव…
सध्या जागेचे भाव गगनाला भिडले असताना सरकारकडून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत. हलगा परिसरात एका गुंठ्याला 10 लाख रुपये मोजावे लागतात. असे असताना सरकारकडून एकरला 3 लाख रुपये भाव देण्यात येत आहे, हा कोणता न्याय? सध्या सुरू असलेल्या महागाईनुसारच गुंठ्याला 10 ते 15 लाख रुपयेप्रमाणे एकरला 4 कोटी रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकऱ्यांनी बैठकीत दिला.









