बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय ते कोर्ट कंपाऊंडला जोडणाऱ्या भुयारी मार्गातील पाणी काढण्याच्या कामाला बुधवारी सुरुवात करण्यात आली. मागील महिनाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मोटारीच्या साहाय्याने भुयारी मार्गातील पाणी बाहेर काढले जात आहे. लाखो रुपये खर्च करून दहा ते बारा वर्षांपूर्वी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. परंतु, याचा वापर तितकासा होत नसल्याचे दिसून येत आहे. वापर होत नसल्यामुळे या ठिकाणी अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे प्रकारही समोर आले होते. त्यातच मुसळधार पावसामुळे भुयारी मार्ग पाण्याने भरला होता.
बॅरिकेड्स लावून भुयारी मार्ग बंद
शालेय विद्यार्थी यामध्ये पोहत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी बॅरिकेड्स लावून भुयारी मार्ग बंद करण्यात आला.
पावसाने उसंत घेतल्याने पाणी काढण्यास प्रारंभ
पावसाने काहीशी उसंत घेतल्याने बुधवारी भुयारी मार्गातील पाणी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण पाणी बाहेर काढण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. दरवर्षी पाणी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला अधिकचा खर्च करावा लागत असल्याने भुयारी मार्गाच्या सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.









