महिला-बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन
बेळगाव : आपले ध्येय सुदृढ भारत व सुदृढ कर्नाटक निर्माण करण्याचे आहे. आपली मुले आणि त्यांचे आरोग्य यासाठी आपण काम करत आहोत. म्हणून प्रत्येकाने आपले काम चोख करा आणि महिला व बालकल्याण खात्याला गालबोट लावू नका, असे आवाहन महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. मंगळवारी बेळगावमध्ये सर्व जिल्ह्यातील उपसंचालकांच्या सभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील आमदार आणि अधिकाऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरावे, त्यांना स्पष्ट माहिती द्यावी, आहाराच्या दर्जाकडे लक्ष द्या, कोणत्याही मुलाला निकृष्ट आहार दिला जाऊ नये, याकडे लक्ष ठेवा. आपण आज मंत्री आहोत, पाच वर्षांनी बदल होऊ शकतो. परंतु अधिकारी मात्र तेच असतात. म्हणूनच कोणताही गोंधळ निर्माण होईल असे काम करू नका. प्रत्येक जिल्ह्याला गॅस सिलिंडर, भाजीपाला, फळे आणि निधी योग्यरितीने पुरविला जाईल, याची काळजी घ्या. सातत्याने अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या सभा घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. क्षीरभाग्य योजनेतील दुधाची पावडर सर्वांना पोहोचवा, वाहनांचे भाडे आता देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनीच खात्याची प्रतिमा उंचावेल असेच काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी खात्याचे कार्यवाह डॉ. जे. सी. प्रकाश, संचालक अर्चना, विशेष कर्तव्य अधिकारी निश्चल व्ही. एच. उपस्थित होते.









