नगरसेविका अफ्रोज मुल्ला यांचे महापौरांना निवेदन
बेळगाव : प्रत्येक वॉर्डामध्ये कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी कमीत कमी रकमेचे टेंडर्स निवडले गेले पाहिजेत. प्रत्येक अधिकारी आपल्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरला काम देत आहे आणि महानगरपालिकेच्या कामामध्ये जे एजंटराज चालले आहे, त्याचा नागरिकांना त्रास होत असून लोकांची लूट होत आहे. हे सर्व प्रकार त्वरित थांबवण्याची मागणी वॉर्ड क्र. 5 च्या नगरसेविका अफ्रोज शकील मुल्ला यांनी केली आहे. याबाबत महापौर शोभा सोमनाचे यांना त्यांनी निवेदन दिले असून त्यामध्ये म्हटले आहे, की आपल्या वॉर्डातील सफाई कर्मचाऱ्यांच्या पॅकेजमध्ये गोंधळ सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी कामगार नेमावेत. ड्रेनेज चेंबर क्लिन करणारे कामगार पीडब्ल्युडी विभागाच्या अखत्यारित काम करतात, त्यांना पुन्हा एरिया हेल्थ इन्स्पेक्टर टीममध्ये ठेवले जावे. महत्त्वाचे म्हणजे जन्मदाखल्याच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोर्ट ऑर्डर आणायला सांगणे हे गरिबांसाठी त्रासदायक आहे. जन्मदाखला देण्यासाठी पालकांचे आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला याआधारे दुरुस्ती करून दिली पाहिजे. तसेच वॉर्डातील अधिकाऱ्यांचीसुद्धा बदली करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.









