काम बंद केल्याने आरळहट्टी येथील महिला आक्रमक
अथणी : हाताला काम द्या, पोटाला अन्न द्या, जनावरांना चाऱ्याची व्यवस्था करा. नाही तर आपले अन्यत्र स्थलांतर करा, या मागणीसाठी रोहयोमध्ये काम करणाऱ्या महिलांनी काम नसल्याने आरळहट्टी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी आपल्या हाताला काम देण्याची मागणी केली. दुष्काळ भागांमध्ये गेले अनेक महिने रोहयो योजनेचे काम सुरू आहे. सर्वांना काम दिले आहे. परंतु ज्यांची शंभर दिवस हजेरी लागली आहे. त्यांना मात्र कामापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कामाअभावी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा फटका येथील 150 हून अधिक महिलांना कामाअभावी गेले दोन दिवस थांबावे लागले आहे. यामुळे संताप व्यक्त करत सदर कामगार महिलांनी तात्काळ काम देण्याची मागणी करीत आरळहट्टी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन छेडताना मागणीकडे लक्ष वेधले. अधिकाऱ्यांची पाठच ठिय्या आंदोलन करूनही यावेळी कोणतेही अधिकारी हजर झाले नाहीत. यामुळे आंदोलक महिलांना रिकाम्या हाती परत जावे लागले. यावेळी नंदा कदम, महादेवी पाटील, गंगुबाई कदम, सुराबाई कदम, शालन मोरे यांच्यासह महिलांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले होते.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
याविषयी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष संभाजी आवळकर यांनी, सदरचा परिसर दुष्काळ भाग असून सर्वांना काम द्यावे, जनावरे जगविण्यासाठी जर सरकारला होत नसेल तर आम्हाला दुसऱ्या राज्याला पोटासाठी पाठवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी
यावेळी पीडीओ परशराम मतगुणकी यांच्याशी संपर्क साधला असता राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे एखाद्या मजुराला शंभर दिवस काम दिले की त्यांना परत काम देऊ शकत नाही. त्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून त्यांची परवानगी घेऊन काम द्यावे लागते, असे त्यांनी सांगितले.









