आजपासून साखळी उपोषणाला होणार सुरुवात : सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास उग्र आंदोलन
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राहक आयुक्त न्यायालय गुलबर्ग्याला सुरू केल्यामुळे बेळगावमधील वकिलांनी तीव्र आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत या ठिकाणी ग्राहक आयुक्त न्यायालय सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून तिसऱया दिवशीही वकिलांनी कामबंद केले आहे. शुक्रवारपासून साखळी उपोषणालाही सुरुवात करणार असून सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशारा वकिलांनी दिला आहे.
बेळगावमध्ये ग्राहक आयुक्त न्यायालय सुरू करण्यासाठी मार्गसूची जारी करण्यात आली होती. मात्र अचानक गुलबर्गा येथे हे ग्राहक आयुक्त न्यायालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील ग्राहकांना तसेच वकिलांना त्याचा मोठा त्रास होणार आहे. वास्तविक, गेल्या दीड वर्षापासून जागेचा शोध सुरू होता. जिल्हा प्रशासनाने जागा देण्यास विलंब केला. त्यामुळे काहीवेळ काम रेंगाळले होते. वकिलांनी जागेची छाननी केली होती. असे असताना अचानकपणे गुलबर्गा येथे ग्राहक आयुक्त न्यायालय सुरू करण्यात आले आहे.
याची माहिती वकिलांना मिळताच तातडीने आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करण्यात आला. याचबरोबर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. बेळगाव जिल्हय़ाचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे बेळगावात ग्राहक आयुक्त न्यायालय झाले पाहिजे, अशी सर्वांचीच मागणी आहे. ग्राहक आयुक्त न्यायालयामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. ते खटले सोडविणेदेखील महत्त्वाचे आहे.
त्यामुळे वकिलांनी हे आंदोलन सुरूच ठेवले आहे. जोपर्यंत बेळगावमध्ये ग्राहक आयुक्त न्यायालय सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार वकिलांनी केला आहे. केएटीप्रमाणेच हेही आंदोलन तीव्र करू, असा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती बार असोसिएशनने दिली आहे. त्यासाठी व्यासपीठाची उभारणीदेखील करण्याची तयारी सुरू केली आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष ऍड. सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष
ऍड. सुधीर चव्हाण, जनरल सेपेटरी ऍड. गिरीराज पाटील, ऍड. एन. आर. लातूर, ऍड. नागेश सातेरी,
ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. श्रीकांत कांबळे, माजी उपाध्यक्ष ऍड. गजानन पाटील, सदस्य ऍड. इरफान बयाळ, महिला प्रतिनिधी ऍड. पूजा पाटील, ऍड. लक्ष्मण पाटील, ऍड. श्रीधर मुतकेकर, ऍड. मारुती कामाण्णाचे आदी वकील उपस्थित होते.
आज उपोषण करणारे वकील
ग्राहक आयुक्त न्यायालय बेळगावात स्थापण्यासाठी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दि. 17 रोजी साखळी उपोषणात अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. बसवराज सुलतानपुरी, ऍड. एस. आय. गणमुखी, ऍड. आर. सी. पाटील, ऍड. अरुण मरेण्णावर, ऍड. अरीफ नदाफ,
ऍड. अजय मडीयाळी, ऍड. प्रकाश पाटील, ऍड. किरण पुजेरी भाग घेणार आहेत.









