मुख्यजिल्हा सत्र न्यायाधीशांना दिले निवेदन
बेळगाव : गुलबर्गा येथे वकिलाचा खून करण्यात आल्यामुळे येथील बार असोसिएशन व वकिलांनी काम बंद आंदोलन छेडले. कोणत्याही प्रकारच्या खटल्याची सुनावणी तसेच निकाल देऊ नये यासाठी बार असोसिएशनच्यावतीने मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशा विजयालक्ष्मी देवी यांना निवेदन दिले. गुलबर्गा येथे न्यायालयाकडे जात असताना ईरणगौडा पाटील (वय 40) या वकिलांवर हल्ला करण्यात आला. काही जणांनी पळून जाऊन त्याला पकडून त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे वकील असुरिक्षत असून वकिलांसाठी तातडीने संरक्षण कायदा लागू करावा, अशी मागणी देखील करण्यात आली. शुक्रवारी सकाळीच बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला सर्व वकिलांनी पाठिंबा दिला. त्यानंतर तातडीने मुख्य जिल्हासत्र न्यायाधीशांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्यात आले. बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील, जॉईंट सेक्रेटरी बंटी कपाई यांच्यासह सर्व वकिलांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला. यावेळी न्यायालयातूनच भव्य फेरी काढण्यात आली. त्यानंतर मुख्य जिल्हासत्र न्यायाधीशांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.









