आपत्ती नियंत्रण कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना सूचना : अतिवृष्टी झाल्यास काम करण्यास सज्ज राहण्याचा आदेश
बेळगाव : लवकरच मान्सूनला सुरुवात होणार आहे. अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील गावांना फटका बसण्याची भीती असून आतापासूनच दक्षता घेण्यासाठी आराखडा तयार करा. नदीकाठावरील गावांची पाहणी करा आणि कोणती गावे स्थलांतरीत करायची आहेत, त्याची यादी तयार करून नागरिकांची सोय करा. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी खबरदारी घ्या आणि उपाययोजना करा, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती नियंत्रण कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी ही सूचना केली आहे. कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांच्या काठावर असलेल्या गावांना पूर येण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. तेव्हा त्याची पूर्ण पाहणी करून ती गावे इतरत्र हलविण्यासाठी नियोजन करा, असे यावेळी सांगण्यात आले. पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे त्यांना स्थलांतरीत करणे महत्त्वाचे आहे. निवारा केंद्रे स्थापन करण्याबाबत आताच आराखडा तयार करा. निवारा केंद्रांमध्ये नागरिकांची जेवण तसेच इतर सोय करावी. धोकादायक विद्युतखांब आताच हटविणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी हेस्कॉमने पाऊल उचलावे, असेही ते म्हणाले. आपत्कालीन सेवेसाठी लागणाऱ्या बोट, जेसीबी यासह इतर साहित्याची जुळवाजुळव करा. जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. ज्या गावांना धोका जास्त आहे, त्या गावांना आताच याबाबत माहिती द्या. जनावरांसाठीही निवारा केंद्राची सोय करावा. प्रत्येक तालुक्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घ्या. पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास ती दूर केली पाहिजे. शेतामध्ये विद्युततारा लोंबकळत असतील तसेच तुटून पडल्या असतील तर दुरुस्ती करा, असे सांगण्यात आले.
नदी-नाल्यांच्या सफाईकडे लक्ष द्या
अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. त्यानंतर त्या नदीचे पाणी गावांमध्ये तसेच शिवारांमध्ये शिरते. त्यामुळे मोठे नुकसान होते. त्यासाठी नदी-नाले स्वच्छ करा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. धोकादायक ठिकाणी फलक लावा. धोकादायक झाडे हटविण्यासाठी वनविभागाची मदत घ्या. एकूणच नदी-नाल्यांसह परिसरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पाणी समस्या दूर करण्यासाठी टँकरचा आधार घ्या
सध्या जलाशयांमध्ये पाणी उपलब्ध असले तरी अनेक गावांना जलाशयांचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे त्याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. तहसीलदारांनी याबाबत गांभीर्याने घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एनडीआरएफ पथक जूनमध्ये
जिल्ह्यामधील नदीकाठावरील गावांना पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे जूनमध्ये एनडीआरएफ पथके दाखल होणार आहेत. आवश्यक ठिकाणी पथके पाठविली जातील. तहसीलदारांना याबाबत सूचना करण्यात आली आहे. परिस्थितीनुसार किती पथके लागणार आहेत, याचे नियोजन केले जाणार आहे. मात्र यासाठी आतापासूनच सर्व अधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
नियंत्रण कक्षाची स्थापना करा
आपत्कालीन परिस्थिती दूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याठिकाणी फोनद्वारे आलेले संदेश तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले पाहिजेत. प्रत्येकाने प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. कोणीही बेजबाबदारपणे वागू नये. कारण त्यामुळे मोठी हानी होऊ शकते. प्रत्येकाने काळजीपूर्वक काम करावे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. धोकादायक असलेल्या ठिकाणी फलक लावणेही गरजेचे आहे. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यानेही काम करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला प्रांताधिकारी बलराम चव्हाण, जिल्हा नागरी व विकास कक्षाचे प्रकल्प संचालक डॉ. ईश्वर उळाग•ाr यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना…
महापालिका, नगरपंचायती, नगरपालिका आणि ग्राम पंचायतींना कचऱ्याचे नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावणे, ड्रेनेजची समस्या असल्यास पावसाळ्यापूर्वी दूर करा, असेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एकूणच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आतापासूनच कामाला लागावे. कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.









