फुटपाथ बनविण्यापूर्वी बसविलेले दिवे गंजले : स्मार्ट सिटी अधिकाऱयांचे दुर्लक्ष, काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली विकासकामे व्यवस्थित झाली नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. क्लबरोड येथील काम पूर्णपणे बंदच ठेवले असून कामे अर्धवट झाली आहेत. परिणामी रस्त्याशेजारी फुटपाथ बनविण्यापूर्वी बसविलेले पथदीप गंजले आहेत. याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. अर्धवट असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचना सातत्याने करण्यात येते. पण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मध्यवर्ती बसस्थानक तसेच मंडोळी रोड अशा विविध ठिकाणी उघडय़ा सळय़ांमुळे नागरिकांचे जीव गेले आहेत. याची कल्पना स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना असूनही कामे पूर्ण करून घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
राणी चन्नम्मा चौक ते गांधी चौक (अरगन तलाव) पर्यंतच्या क्लबरोडचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या दुतर्फा गटारी आणि पेव्हर्स घालण्याचे काम करण्यात येत आहे. पण या रस्त्याच्या एका बाजूच्या गटारीचे काम पूर्ण झाले असून दुसऱया बाजूचे काम अर्धवट अवस्थेत आहे. सीपीएड मैदान ते अरगन तलावपर्यंत गटारीचे बांधकाम रखडले आहे. सदर बांधकाम मागील काही महिन्यांपासून बंद असून रस्त्याशेजारी गटारीसाठी घालण्यात आलेल्या सळय़ा उघडय़ावर सोडण्यात आल्या आहेत. हा रस्ता खूप वर्दळीचा असून या रस्त्यावरून सीपीएड मैदानावर जाणारे मॉर्निंग वॉकर्स तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते.
चार महिन्यांपासून काम बंद
रस्त्याशेजारी फुटपाथ निर्माण करण्यापूर्वीच दिवे बसविले आहेत. सदर दिवे गंजण्यास प्रारंभ झाला तरी फुटपाथचे काम पूर्ण झाले नाही. फुटपाथ निर्माण करण्यासाठी पेव्हर्स आणण्यात आले आहेत. मात्र चार महिन्यांपासून काम सुरू नाही. या परिसरात बिबटय़ाच्या धास्तीने काम बंद ठेवण्यात आले होते. पण अद्यापही काम बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे क्लब रोडचे काम आणखी किती वर्षे चालणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. सदर काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.









