उत्तर कर्नाटकातील युवकांसाठी सोय : बेळगावमध्ये दोन खासगी वैमानिक प्रशिक्षण केंद्रे लवकरच
बेळगाव : बेळगाव विमानतळावर दोन फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (वैमानिक प्रशिक्षण संस्था) मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी एक एफटीओ महिनाभरापूर्वी कार्यान्वित झाली आहे. दुसऱ्या एफटीओचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बेळगावमध्ये दोन खासगी वैमानिक प्रशिक्षण केंद्रे लवकरच सुरू होतील. यामुळे बेळगाव, बागलकोट, विजापूर, हुबळी, कोल्हापूर या परिसरातील युवकांना वैमानिक प्रशिक्षण घेणे सोयीचे ठरणार आहे. ज्यांना वैमानिक म्हणून करिअर घडवायचे आहे, त्यांना प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे असते. सरकारी प्रशिक्षण संस्थेसह अनेक खासगी संस्था वैमानिक प्रशिक्षण देतात. देशात पुढील काळात वैमानिकांची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होणार असल्याने 5 ते 6 वर्षांपूर्वी देशभरातील महत्त्वाच्या विमानतळांवर एफटीओंना मंजुरी देण्यात आली. यामध्ये बेळगाव विमानतळासाठी दोन एफटीओंना केंद्रीय नागरी विमानो•ाण खात्याने परवानगी दिली. मध्यंतरी आलेल्या कोरोनामुळे या कामाला विलंब झाला. परंतु, त्यानंतर मात्र एफटीओच्या बांधकामाला सुरुवात झाली.
खासगी वैमानिक प्रशिक्षण सुरू
बेळगाव विमानतळाच्या मुख्य धावपट्टीपासून एफटीओपर्यंत टॅक्सीट्रॅक तयार करण्यात आला. दोन्ही एफटीओसाठी 5 हजार चौरस फूट जागा मंजूर करण्यात आली. बेळगाव विमानतळावर असणाऱ्या खुल्या जागेत हे एफटीओ बांधण्यात आले. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर एफटीओचे बांधकाम करण्यात आले. दिल्ली येथील रेडबर्ड या कंपनीने एफटीओचे काम लवकर पूर्ण करत एप्रिल 2023 पासून कार्यारंभ केला. यामुळे बेळगावमध्ये सध्या खासगी वैमानिक प्रशिक्षण सुरू झाले आहे.
विमानतळ अधिकाऱ्यांकडून हँगरची पाहणी
बेंगळूर येथील समवर्धने या कंपनीने दुसऱ्या एफटीओचे काम सुरू ठेवले आहे. येत्या महिनाभरात काम पूर्ण होणार असून त्यानंतर येथेही वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. यासाठी भव्य हँगर उभा करण्यात आला असून त्यामध्ये केबिन, क्लासरुम तसेच लहान विमान ठेवण्याची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नुकतीच विमानतळ अधिकाऱ्यांनी हँगरची पाहणी करून लवकर सुरुवात करण्याच्या सूचना केल्या.









