रेल्वे प्रवाशांमधून समाधान : प्रवाशांची पायपीट काहीशी कमी होणार
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. मागील आठ दिवसांत फूट ओव्हर ब्रिजच्या कामाला गती मिळाली असून लोखंडी पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण झाल्यास प्रवाशांची पायपीट काहीशी कमी होणार आहे. रेल्वे स्थानकातील जुना फूट ओव्हर ब्रिज वर्षभरापूर्वी काढण्यात आला. सध्या असलेला फूट ओव्हर ब्रिज रेल्वे स्थानकाच्या एका बाजुला असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3 व 4 वर पोहोचण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकाला वळसा घालून फूट ओव्हर ब्रिज गाठावा लागत होता. त्यामध्ये वयोवृद्ध व लहान मुलांचे हाल होत होते.
त्यामुळे काहीजण जीव धोक्यात घालून प्लॅटफॉर्मवरून ये-जा करीत होते. यामुळे अनेकवेळा नाराजी व्यक्त करण्यात आली होती. खासदार जगदीश शेट्टर यांनी दोन महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानकाची पाहणी करून फूट ओव्हर ब्रिज बांधणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदाराला धारेवर धरले. वर्षभरापासून कोणतेच काम सुरू नसल्याने खासदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही महिनाभर काम पूर्णपणे ठप्प होते. संबंधित कंत्राटदाराला पुन्हा समज दिल्याने अखेर कामाला सुरुवात करण्यात आली. आठ दिवसांत ओव्हर ब्रिजच्या कामाला गती मिळाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यास प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. आता अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करत ब्रिजचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.









