धोक्याच्या ठिकाणी रिफ्लेक्टर-कठड्यांची सोय
खानापूर : खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम झाले आहे त्या ठिकाणी धोकादायक रस्ता बनलेला आहे. याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत’ने पाच दिवसापूर्वी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदाराला तातडीने धोक्याच्या ठिकाणी सूचनाफलक व योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी आदेश दिले होते. कंत्राटदार म्हात्रे यांनी याबाबतचे काम सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे. खानापूर ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षापासून रेंगाळले होते. मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये म्हात्रे यांना या रस्त्याचे काम पुन्हा देण्यात आले. म्हात्रे यांनी खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत रस्त्याचे काम संथगतीने सुरू केले होते. खानापूरपासून रामनगरपर्यंत बऱ्याच ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार झाला होता. त्यामुळे दुसऱ्या बाजूला दोन फूट खोलीची चर निर्माण झाली होती. रस्त्यावरून वाहतूकही सुरू केली होती. मात्र ही वाहतूक अंत्यत धोकादायक बनली होती. रस्त्यावर दुसऱ्या बाजूने धोक्याच्या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे या रस्त्यावर अनेकवेळा छोटेमोठे अपघात घडले होते.
चर पडलेल्या ठिकाणी कठडे-रिफ्लेक्टर बसवण्यास प्रारंभ
त्यामुळे या ठिकाणी धोक्याच्या उपाययोजना करणे गरजेचे होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कंत्राटदार म्हात्रे यांनी या रस्त्यावर दोन दिवसांपासून काम सुरू केले आहे. रस्त्याच्या एका बाजूला कठडे उभारले असून चर पडली आहे त्या ठिकाणी खांब उभे करून रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. तसेच वळणाच्या ठिकाणी मोठे सूचनाफलक लावून वळणाची दिशा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.









