जतेत भाजपचा मेळावा
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजना मार्गी लावण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. या योजनेला शासनाने तांत्रिक मंजुरी दिली असून लवकरच त्याला प्रशासकीय मंजुरी मिळेल व 20 जानेवारीला निविदाही प्रसिद्ध होईल. जतची विस्तारित म्हैसाळ योजना मार्गी लावणारच अशी पुनश्च ग्वाही राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जतकारांना दिली.
जत येथे भाजपच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात अमृतवाडीच्या सरपंच पार्वती पडळकर, बेवनूरचे सरपंच सुभाष कांबळे यांच्यासह बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री खाडे यांनी विस्तारित योजनेबाबत माहिती दिली.
यावेळी आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील, आकाराम मासाळ, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संग्रामसिंह जगताप, माजी अध्यक्ष सुनील पवार, प्रभाकर जाधव, शंकर वगरे, आप्पासाहेब नामद, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, नगरसेवक गौतम ऐवाळे, महिला आघाडीच्या तेजस्विनी व्हनमाने आदी उपस्थित होते.
ना. खाडे म्हणाले, महाराष्ट्राने जत पूर्व भागाला पाणी देण्यासाठी कर्नाटककडे मागणी केली होती पण कर्नाटकने पाणी देण्यास नकार दिल्याचे सांगत मंत्री खाडे म्हणाले की जर पूर्व भागातील ६५ गावांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठीच आपण विस्तारित म्हैसाळ योजनेचा मंत्रालयात पाठपुरावा सुरू केला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये खासदार संजयकाका पाटील व आपण स्वतः म्हैसाळ योजनेबाबत मुख्यमंत्र्याकडे जतकरांच्या वतीने आग्रही भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेला सकारात्मक प्रतिसाद देत ही योजना पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
आ. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या खास शैलीत राष्ट्रवादी व राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील, जतचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर जोरदार तोफ डागली. २०१४ मध्ये जतकरांनी विलासराव जगतापांचा पराभव करत मोठी चूक केली ती चूक २०२४ मध्ये करू नका असे आवाहन केले. तसेच आ. पडळकर म्हणाले की, जत पूर्व भागात पाणी मिळाले नाही, जतचा विकास झाला नाही यास राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हेच जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकावा असे आवाहन त्यांनी केले.
जगताप यांनी घतला खरपूस समाचार
माजी आमदार विलासराव जगताप यांनी माजी मंत्री जयंत पाटील, आ. विक्रमसिंह सावंत, तुकाराम बाबा, योगेश जानकर यांचा खरपूस समाचार घेतला. म्हैसाळबाबत अद्याप बैठक झालेली नाही असे असताना २०० कोटी मिळाले असे सांगतात ते साफ चुकीचे आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी जतला पाणी दिले म्हणून पोस्टरबाजी केली पण पुढे काहीच केले नाही. आ. सावंत हे दिशाभूल करतात. तुकाराम बाबा यांना पाण्याची काहीच माहिती नसताना मुख्यमंत्र्यांना नकाशे दाखवतात. तुकाराम बाबा हे भोंदू आहेत. बाळासाहेबांची शिवसेनेचे योगेश जानकर यांचा जतमध्ये काय संबंध, काय योगदान आहे असा सवाल उपस्थित करत पाण्याचा मुद्दा घेतला की आमदार होता येते हा काहीजणांचा भ्रम झाल्याचा टोला जगताप यांनी लगावला.
यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख, प्रभाकर जाधव, सुनील पवार, प्रमोद सावंत, संग्रामसिंह जगताप यांनी जतमध्ये भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.