वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही सदनांमध्ये सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला एका ट्विटर संदेशात त्यांनी आपले मनोगत लोकांसमोर व्यक्त केले आहे.
संसदेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण असेल अशी भावपूर्ण प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. संसदेची नूतन वास्तू भव्य आणि सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी आहे. अशा वास्तूची अत्यंत आवश्यकता होती. ही वास्तू पूर्ण होऊन आता तिचा उपयोग संसदीय कार्यासाठी होणार आहे. या नव्या वास्तूमुळे लोकही हर्षित झाले आहेत, असे स्पष्ट करतानाच सर्वांनीच पूर्वग्रह वगळून या ऐतिहासिक महत्वाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अमित शहा यांनी केले.









