प्रतिनिधी / बेळगाव : बेळगाव – धारवाड, बागलकोट – कुडची रेल्वेमार्ग करण्यासंदर्भात, आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा वाढवण्यासंदर्भात, बळ्ळारी नाल्याची समस्या राष्ट्रीय महामार्ग बेळगाव ते कोल्हापूर आणि बेळगाव ते खानापूर या मार्गासंदर्भात आढावा घेऊन अधिकाऱ्यांना ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात पाऊले उचला. अशी सक्त ताकीद पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या सर्व समस्या संदर्भात काही अडचणी असल्यास त्या सांगा तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात या समस्या संदर्भात आढावा घेण्यासाठी बैठका घेण्यात आल्या त्यामध्ये या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
बेळगाव – खानापूर रस्ता तातडीने पूर्ण करा :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ A रस्ता काही ठिकाणी अजूनही अर्धवट आहे. तो पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कंत्राटदारांनी एक महिन्यात रस्ता पूर्ण केला जाईल असे सांगितले. झाडशाहपुर आणि हत्तरगुंजी या ठिकाणी काम अर्धवट असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.
हलगा – मच्छे बायपास रस्त्याबाबत चर्चा :
हलगा मच्छे बायपास रस्ता अजून पूर्ण का झाला नाही अशी विचारणा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली. त्यावर न्यायालयामध्ये शेतकरी गेल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. चार किलोमीटर पर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवली त्यामुळे काम प्रलंबित असल्याचे कंत्राट दराने सांगितले. काही शेतकऱ्यांची जमीन रस्त्यामध्ये गेला नाहीत मात्र पैसे घेतले नाही मात्र पैसे घेतले आहेत ते परत द्या. पैसे दिले नाहीत तर त्यांच्याकडून जमिनी लिलाव करा असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्याबाबत सूचना :
बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्याबाबत सूचना करण्यात आली महत्वाची म्हणजे लघुपाठबंधारे खाते महापालिका यांनी संयुक्तपणे त्याची पाहणी करून आराखडा तयार करावा असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
धावपट्टीसाठी शंभर एकर जमिनीची गरज :
या परिसरातील शेतीचे व्यवहार होऊ नयेत त्यासाठी भारतीय हवाई दलाचे नाव जमिनीला दाखल करा. कोल्हापूर-बेळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम तातडीने सुरू करा. सध्या असलेला रस्ता खराब झाला असून तातडीने त्याची दुरुस्ती करण्याची सूचना देखील यावेळी करण्यात आली. बेळगाव – धारवाड रेल्वेमार्गाचे काम सुरू करा तसेच बेळगाव बागलकोट रस्त्याचीही सुरुवात करा. अशी सूचना करण्यात आली.
या बैठकीला खा. मंगला अंगडी, खा. इरण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही यांच्यासह इतर उपस्थित होते.