लोकायुक्त न्यायमूर्ती पाटील यांचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन
बेळगाव : बेळगाव संपूर्ण राज्यात विस्ताराने मोठा जिल्हा आहे, प्रशासकीय दृष्टिकोनातूनही मोठा आहे. हा जिल्हा भ्रष्टाचारमुक्त बनविण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन लोकायुक्त न्यायमूर्ती बी. एस. पाटील यांनी केले. सुवर्ण विधानसौधमधील सेंट्रल हॉलमध्ये बुधवारी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना न्या. पाटील पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी सरकार अनेक योजना राबविते. यासाठी भरपूर अनुदानही दिली जाते. सरकारी योजना व अनुदान प्रामाणिकपणे पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. या कामी भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्याच्या प्रशासनात लोकहित असेल तर राज्याच्या विकासात ते मोठे योगदान ठरणार आहे. सरकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा स्तरही उंचावणार आहे. सरकारी नोकर व कर्मचाऱ्यांना सरकार अनेक सोयीसुविधा, सवलती देते. या पगारातून ते उत्तम जीवन जगू शकतात. तरीही काही अधिकारी अति आशेने भ्रष्टाचारात गुंतलेत, अशा तक्रारी आहेत. भ्रष्टाचार सिद्ध झाला तर त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे लोकायुक्तांनी सांगितले.
प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यावर त्यांची जबाबदारी सोपविलेली असते. ते व्यवस्थितपणे आपली जबाबदारी पार पाडतात की नाही, हे पाहण्यासाठी सुपरवायझरही असतात. तरीही सरकारी कामे सुरळीतपणे होत नाहीत. एक व्यक्ती एकाच कामासाठी वारंवार सरकारी कार्यालयात येते. याचाच अर्थ सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत, असा होतो. अति आशेपोटी काही अधिकारी व कर्मचारी आपल्या कुटुंबालाच अडचणीत आणतात. प्रत्येकांनी आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करावे. जो प्रामाणिकपणे कायदेशीर काम करतो, तोच खरा जनसेवक ठरतो, असेही लोकायुक्तांनी सांगितले.
सरकारी कामात असताना प्रत्येकाला लोकायुक्त कायद्याची जाणीव असावी. सार्वजनिक सेवेत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातून होणारी चूक लहान असो किंवा मोठी शिक्षा ही ठरलेलीच आहे. जिल्ह्यातील तलावांचे संरक्षण करावे, शहर स्वच्छतेवर भर द्यावा, सरकारी इस्पितळांमधील व्यवस्थेत सुधारणा करावी, असे आवाहनही लोकायुक्तांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, लोकायुक्त सचिव श्रीनाथ, अप्पर निबंधक प्रकाश नाडगेर, सी. राजशेखर, रमाकांत, शुभवीर जैन, श्रीकांत के., लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय आदी उपस्थित होते.
कामकाज-प्रलंबित कामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी
लोकायुक्तांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी विविध सरकारी कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाजाची व प्रलंबित कामांची पाहणी केली. दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, महानगरपालिकेचे अशोकनगर येथील विभागीय कार्यालय, अबकारी, जेडीएलआर, एडीएलआर, तालुका पंचायत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास निगम आदी कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली.









