रत्नागिरी, प्रतिनिधी
Ratnagiri Crime News : थेट टेलिग्रामद्वारे आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली आहे. फसवणूकीची ही घटना 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान घडली. याप्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ऑनलाईनच्या माध्यामातून फसवणूकीचा हा आता नवा फंडा समोर आलेला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादीच्या टेलीग्राम अॅपवर ‘वर्क फ्रॉम होम’करण्याबाबत अनोळखी मोबाईल क्रमांकावरून विचारणा करण्यात आली. फिर्यादीने होकार कळवताच आपण एका हॉटेल बुकिंगच्या साईटचे प्रतिनिधी असल्याचे संशयिताने सांगितले. यानंतर त्यांनी एक लिंक पाठवून त्यात डिटेल्स भरायला सांगितले. यानंतर फिर्यादि एका ग्रुपमध्ये जॉईन झाला.या ग्रुपमध्ये ग्रुपचे अॅडमीन जिन्सन जॉर्ज, अभिषेक शेट्टी आणि दुसऱ्या ग्रुपचे अॅडमिन डेल्वीन व इतर व्यक्ती होते.त्यानंतर संशयित मोहनने फिर्यादी यांच्या मोबाईलवर वेळोवेळी हॉटेल बुकिंग रिह्यू देण्याकरिताचे टास्क पूर्ण करण्यास सांगितले.त्यानंतर पुढील टास्कला आगावू रक्कम भरण्यास सांगितले.त्याप्रमाणे फिर्यादी यांच्याशी संपर्क साधत वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती देऊन त्यात पैसे भरण्यास सांगितले.याप्रमाणे फिर्यादीने साक्षीदार मोरे यांच्या व वडिलांच्या बँक खात्यावरून संशियिताच्या सांगण्याप्रमाणे वेळोवेळी 7 लाख 81 हजार 100 रुपये भरले.
फिर्यादी यांच्याकडून घेतलेले डिपॉझिटचे पैसे साईटकडून त्यांना परत मिळाले नाहीत.शिवाय विनंती करूनही त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसात गुन्हा नोंद केला. याप्रकरणी संशयिताविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.