पुढील 12 वर्षांपर्यंतचे केले प्लॅनिंग
कोरोना महामारीमुळे जगभरात कर्मचाऱयांना घरातून काम करण्याची सुविधा देण्यात येऊ लागली आहे. पुन्हा एकदा कोरोना संकट वाढत असल्याचे पाहून कंपन्या कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देत आहेत. अशा स्थितीत काही कर्मचारी या संधीचा स्वतःच्या छंदाला वेळ देण्यासाठी वापर करत आहेत. अशाच एका 28 वर्षीय मेटा कर्मचाऱयाने काम करत पूर्ण जग फिरण्याचा विचार केला आणि याकरता कोटय़वधी रुपये खर्च करण्यास त्याने मागेपुढे पाहिले नाही.

28 वर्षीय मेटा कर्मचारी ऑस्टिन वेल्स हा सॅन डियागोचा रहिवासी आहे, परंतु कंपनीकडून त्याला वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळाली आहे. अशा स्थितीत त्याने याला जगभ्रमण करत काम करण्याच्या संधीत रुपांतरित केले आहे. घर बसून काम करण्याऐवजी ऑस्टिनला क्रूज शिपमध्ये राहून काम करण्याची कल्पना अधिक चांगली वाटली. 2-4 आठवडे तेथे राहण्याऐवजी ऑस्टिनने क्रूजमध्ये स्वतःचे अपार्टमेंटच बुक केले आणि ते पुढील 12 वर्षांसाठी भाडय़ाने घेतले आहे.

लोक एका नोकरीत स्वतःसाठी 60-70 लाखांचे घर मोठय़ा मेहनतीने तयार करू शकतात, तर दुसरीकडे फेसबुकमध्ये (आता मेटा) काम करणाऱया ऑस्टिने स्वतःसाठी जगातील सर्वात लक्झरी क्रूज शिप एमव्ही नरेटिव्हमध्ये अपार्टमेंट बुक केले आहे, 12 वर्षांसाठी त्याने हा भाडेकरार केला असून याकरता 3 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामुळे मला वारंवार पॅकिंगची गरज भासणार नाही तसेच ट्रेन किंवा फ्लाइटच्या तिकिटासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. 12 वर्षांपर्यंत क्रूजमधून प्रवास करत ऑफिसचे काम करत राहणार असल्याचे त्याचे सांगणे आहे.
ऑस्टिनने सोशल मीडियावर स्वतःच्या या योजनेबद्दल सांगितले आहे, यावर लोकांकडून वेगवेगळय़ा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. जर मध्येच नोकरी गमवावी लागली तर काय असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला आहे. तर काही जणांनी इतके पैसे असताना नोकरी करण्याची गरज काय अशी विचारणा केली आहे.









