चिपळूण :
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सूचवलेल्या कामांच्या पाहणीनंतर शुक्रवारपासून शक्य त्या कामांना नगर परिषदेने सुरुवात केली आहे. तर मोठ्या कामांचे नियोजन सुरू झाले असून पावसाळ्यापूर्वी सर्व उपाययोजनांची पूर्तता करण्याची तयारी प्रशासन करीत आहे.
तीन दिवसांपूर्वी नगर परिषदेने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मान्सूनपूर्व नियोजन व तयारीसाठी घेतलेल्या बैठकीत पूरमुक्तीसाठी नागरिकांनी अनेक उपाययोजना सूचवल्या. त्याची गुरुवारपासून मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांच्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन नागरिकांना बोलावून पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पानगल्लीतील नाल्याची पाहणी झाली असून या मोठ्या कामाचे जेसीबी किंवा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जुना बसस्थानक येथील गटारातून पाण्याची लाईन गेल्याने त्याचीही पाहणी करण्यात आली आहे
मिरची गल्लीतील पाखाडी व गटारांच्या साफसफाईचे काम शुक्रवारी मार्गी लावण्यात आले आहे. पेठमाप येथील बुरटे यांच्या घराजवळील तसेच खंड-कांगणेवाडीतील गटाराची साफसफाई झाली असून पोस्ट कार्यालयासमोरील गटार कामाचे नियोजन केले जात आहे. रावतळे येथील कामांची पाहणी झाली असून त्याचे नियोजन सुरू आहे. माजी नगरसेवक शशिकांत मोदी, लियाकत शहा, रतन पवार यांनी सूचवलेल्या कामांचे तसेच गटारातून प्लास्टिक बाटल्या वाहून जाऊ नये यासाठी जाळ्या बसवण्याच्या केलेल्या मागणीनुसार त्याचेही नियोजन सुरू आहे .
- मिरजोळी ग्रामपंचायतला देणार पत्र
मिरजोळी बायपास येथे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याचा प्रकार अर्चना कारेकर यांनी लक्षात आणून दिल्याने याची मुख्याधिकारी भोसले यांनी पाहणी केली आहे. त्यानुसार कचरा उचलण्याबाबत मिरजोळी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात येणार आहे.
- वादग्रस्त विषयाबाबत राष्ट्रीय महामार्गाशी चर्चा
सरफराज गोठे यांनी इंदिरा अपार्टमेंट आवारातील सांडपाण्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्यावरून बैठकीत वाद झाला होता. त्यामुळे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी भोसले यांनी या बाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून यावर लवकरच उपाय शोधला जाणार आहे.








