बेळगाव : टिळकवाडी पहिले रेल्वेगेटनजीक महापालिकेकडून नूतन बसथांबा निर्माण करण्यात येत आहे. या कामासाठी 9 लाख 80 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या बसथांब्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेनंतर सदर काम कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. टिळकवाडी हा परिसर सतत गजबलेला असतो. या भागात बसथांबा नसल्याने प्रवासी व नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच त्यांना बसथांबाविना रस्त्यावरच थांबावे लागत होते. याची दखल घेऊन महापालिकेने आपल्या निधीतून बसथांबा निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी दोन-तीन महिन्याअगोदर निविदा प्रक्रिया पार पडली. यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करून बसस्थानक कामासाठी 9 लाख 80 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. सदर बसथांबा कामाला सुरुवात झाली असून लवकरच प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. या परिसरात बसथांबा नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. विविध भागातील येणाऱ्या नागरिकांना कांहीवेळा पावसातच रस्त्यावर थांबावे लागत होते. यामुळे त्यांची कुचंबना होत होती. आता बसथांब्याचे काम सुरू झाले असून नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बसथांबामुळे होणारी गैरसोयही दूर होणार आहे.









