सर्वोच्च न्यायालयाने उचलले पाऊल : जेंडर स्टीरियोटाइप कॉम्बॅट हँडबुक सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि युक्तिवादांमध्ये आता जेंडर स्टीरियोटाइप शब्दांचा वापर होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह शब्दांना रोखण्यासाठी जेंडर स्टीरियोटाइप कॉम्बॅट हँडबुक सादर केले आहे.
कायदेशीर प्रकरणांमध्ये महिलांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर रोखला जाणार असून लवकरच डिक्शनरी सादर केली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने 8 मार्च रोजीच्या महिला दिनी आयोजित कार्यक्रमात जाहीर केले होते. यानुसार बुधवारी 16 ऑगस्ट रोजी हँडबुक जारी करत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी यामुळे न्यायाधीश आणि वकिलांना कुठले शब्द रुढीवादी असून ते कशाप्रकारे टाळता येतील हे समजून घेणे सोपे होणार असल्याचे म्हटले आहे.
या हँडबुकमध्ये आक्षेपार्ह शब्दांची यादी असून त्यांच्या जागी वापरले जाणारे शब्द अन् वाक्यं नमूद आहेत. या हँडबुकचा वापर न्यायालयात युक्तिवाद करताना, आदेश देताना, त्यांची प्रत तयार करताना केला जाऊ शकतो. हे हँडबुक वकिलांसोबत न्यायाधीशांसाठी देखील असल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले आहे.
हे हँडबुक तयार करण्याचा उद्देश कुठल्याही निर्णयावर टीका करणे किंवा संशय व्यक्त करणे नाही. तर अजाणतेपणी कशाप्रकारे रुढीवादाची परंपरा चालत आली हे सांगणे आहे. रुढीवाद काय आहे आणि यामुळे होणारे नुकसान हे सांगणे हा न्यायालयाचा उद्देश आहे. जेणेकरून न्यायालयात महिलांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर टाळता येईल. हे हँडबुक लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती सरन्यायाधीशांनी दिली आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मौसमी भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कायदेशीर शब्दावली तयार केली आहे. या समितीत निवृत्त न्यायाधीश प्रभा श्रीदेवन आणि गीता मित्तल तसेच प्राध्यापिका झूमा सेन यांचा समावेश होता असे त्यांनी सांगितले आहे.









