आमची शब्द शिकण्याची प्रक्रिया जर पाहिली तर आमच्या लक्षात येतं की शब्द येण्याआधीसुद्धा आम्ही आमच्या भावना आमच्या कृतीतून व चेहऱ्यावरच्या रागातून वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतो. ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. तोच हा प्रकार. आमचा होकार, नकार आम्ही न बोलतासुद्धा व्यक्त करू शकतो. त्याचे हे माध्यम. पण जसजसं आम्ही एकेक शब्द बोलायला शिकतो, तसतसा आमचा आनंद चेहऱ्यावरती ओसंडून वाहत असतो. त्याचं वर्णन शब्दांच्या पलीकडचे असते. लहान मुलांच्या चेहऱ्यावरून हा आनंद जास्त ओसंडून वाहताना दिसतो. सुरुवातीला मान हलवून नाईनाई म्हणायला शिकणारा मुलगा त्यांना ना, ना, म्हणता येऊ लागल्यानंतर जो काही त्याला आनंद होतो त्याला तोड नाही. आपला व्यक्त होण्याचा एक मार्ग सापडल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. हे शब्द यायला लागल्यानंतर मूल दुसऱ्याचा चेहरा वाचायला शिकतं कारण त्याच्या शब्दांची प्रतिक्रिया समोरच्याच्या चेहऱ्यावरती आलेली असते. मोठेपणी देखील आम्ही बोलत असताना दुसऱ्यांचे चेहरे जास्त वाचत असतो आणि कसा बरोबर त्याला शब्द लागू पडला हे बघत असतो. प्रेमाचे शब्द तर डोळ्यातूनच जास्त बोलतात तर मायेचे शब्द स्पर्शातून, रागाचे शब्द मात्र आपल्या मुखातून बाहेर पडले तरी त्याला आधार द्यायला हाताने किंवा पायाने मारहाण करताना एकाच वेळी शब्द आणि कृतीतून व्यक्त होत असतात. आई पाठीत धपाटा घालताना तिचा शब्द तेवढ्याच जोरात उच्चारला जातो. त्यामुळे तिचा शब्द अधिक लागला की हाताचा धपाटा हे लक्षात येत नाही, आणि मग या सगळ्याचा परिपाक म्हणून आमच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. शब्द म्हणजे आमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकटीकरणाचा तो एक आविष्कार असतो. साने गुरुजी हा शब्द उच्चारला तरी त्यांच्या कविता किंवा त्यांची वाक्यं आमच्या डोळ्यासमोर येतात. आचार्य अत्रे म्हंटले की त्यांनी शब्दांआधी उभं राहण्याची जी कृती करायचे त्यातून विनोदासाठी एक वातावरण निर्मिती व्हायची. अटलबिहारी वाजपेयी, शिवाजीराव भोसले, व. पु. काळे, द. मा. मिरासदार कल्पनेनेच आम्हाला ऐकू यायला लागायचे. मोदींचा फोटो बघितला तरी आता ते ‘भाईयों और बेहनो’ किंवा ‘मित्रो’ म्हणतील असं उगीचच मनात यायला लागतं. विवेकानंदांचा फोटो मात्र आम्हाला त्यांचं अमेरिकेतले सगळे भाषणच ऐकवून जातं. असे हे शब्द व्यक्तीप्रमाणे निरनिराळ्या वातावरणाची देखील निर्मिती करत असतात. त्या शब्दांमध्ये त्या काळापर्यंत जाण्याचं सामर्थ्य असतं. त्या जागेपर्यंत प्रवास करण्याचा अनुभव असतो. आपण प्रार्थना सुरू केली की मन एका शाश्वत प्रकाशाजवळ स्थिर होतं आणि सर्वत्र एक प्रकारची सकारात्मकता भरून राहते. संतांचे शब्द मात्र परब्रम्हाला भेटून आणतात तर काही वाक्य संतांनाच आपल्या पाठीशी उभं करतात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ किंवा ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ अशी वाक्ये वाचली की साक्षात ते महात्मे आपल्या जवळच उभे आहेत, असं वाटायला लागतं. असे शब्द ज्यांना लाभले त्यांनी माणसांची, समाजाची आणि राष्ट्राची जडणघडण केली आहे हे लक्षात येतं. पण काहींच्या शब्दांमुळेच आपला देश रसातळाला नेलेला आहे. मनामनाच्या दऱ्या वाढवल्यात आणि सततच अस्थिरता पसरली आहे, याची पण जाणीव होते. म्हणजे शब्द दुधारी तलवारीचं काम करतात, जे शब्द शब्दच घडवतात तेच शब्द संहारसुध्दा घडवतात. म्हणून शब्द शब्द जपून ठेव असं वारंवार म्हणायला लागतं कारण शब्द आत्मभान जागे करणारे असतात. अहमपणा संपवणारे असतात आणि असे सुंदर शब्द फार अभावाने ऐकायला मिळतात. म्हणून चांगले शब्द बोला, एवढेच म्हणावेसे वाटते.
Previous Articleजीप दरीत कोसळून केरळमध्ये 9 ठार
Next Article ‘ब्रिक्स’ची दिशा आणि दशा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








