‘शब्दांना सुखही नसते शब्दांना दु:खही नसते
ते वाहतात जे ओझे जे तुमचे माझे असते ’…….
सुधीर मोघ्यांनी लिहिलेल्या या ओळी वाचल्या आणि मनात आलं, आपल्या सगळ्या भावनांना नेमकेपणाने पोहोचवणारे शब्द कसे काय घडत असतील बरं?आणि सध्या तर इंग्रजी माध्यमामुळे मराठी भाषा लोप पावेल की काय अशी भीती जाहीरपणे व्यक्त करताना अनेक लोकांना आपण ऐकत असतो. मी पण ही भीती गेल्यावर्षी माझ्या 93 वर्षाच्या गुरुजींना बोलून दाखवली. त्यांनी मला त्यांच्या तीस वर्षाच्या नातवाचा संवाद सांगितला. आजोबा माझं अकाउंट उघडलं बरं का! लग्न ठरवून आलोय! पण काही नातेवाईक लग्नाच्या यादीतून डिलीट करायला हवेत. या दोन वाक्यात त्यांनी अकाउंट उघडणे आणि डिलीट करणे हे दोन शब्द सहज वापरले. जी भाषा आजच्या पिढीने सहज स्वीकारली ती नष्ट होईलच कशी हे ऐकून मला अगदी हायसं वाटलं आणि प्रत्येक पिढीचे असे काही आपण शब्द शोधायला हवे, असं मनोमन वाटायला लागलं आणि मग मी त्याचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. माझ्या सासूबाई बाहेर पडताना नेहमी म्हणायच्या वाहणा कुठे आहेत? मला आणून दे. येताना पोलकं आणि झंपर शिवून झाले असेल तर ते घेऊन येते. मुलं जेवताना एखादा पदार्थ छान झाला म्हटली की आजी त्यांना हमखास म्हणायची…जेवण झालं की निजा रे ….आता फार गडबड गोंधळ करू नका. फार गडबड केली तर आजोबा रागवतील आणि मसणात जातो म्हणतील. …लगेच काय भूक लागली म्हणता ….अजून डाळ वैरायची आहे. उगीच द्वाडपणा नको. त्या शेजारच्या फिंदरीकडे बघा, सकाळपासून गळा काढतेय..काकवीची धार नुसती.. मी आता जरा वेळाने वाण सामान घेऊन येते…. लुगडी वाळत घालायचीत अजून …सगळं आयुष्य गेलं रांधा वाढा आणि उष्टी काढा याच्यातच. चाललंय …तुमचे तीर्थरूप मामलेदार नाहीत ना! आलं का लक्षात? नंतर सायकली आल्या…. अरे याचा चेहरा पंक्चर झाल्यासारखा दिसतोय… त्याला मास्तरने अस्सा धुतला ….आता श्यामची आईपण धुणार केरसुणीने…. चला पोबारा करा ….शिकून मोठे बॅरिस्टर होणार की काय… आता तू कुठे हिंडतेस हाडळी सारखी.. केस मोकळे सोडून. अक्काबाईचा फेरा केव्हा येईल सांगता येत नाही बरं!… बांध ते केस ..काय वरण सपक झालंय म्हणतोयस आणि वड्या अलवार झाल्यात ..होवू दे …तहान लाडू भूक लाडू ठेवा हो बरोबर …दशम्या ठेवल्या की बरं वाटेल.. आणि हो पाण्याचा गडवा घ्या …सरंजाम छान जमलाय …सगळं कसं साजरं झालं….हे सगळे शब्द जरासे जड वाटायचे पण एक त्याच्यात भारदस्तपणा असायचा. हल्ली मात्र कोणते शब्द कसे अंगावर येतील ते माहीत नसतात. ‘हाय ब्रो’ कसा आहेस? मला फक्त आयब्रो माहिती होत्या. हाय डूड कुठे चाललास? मला फक्त लुडबुड, गुड गुड हे शब्द आतापर्यंत माहिती होते…. कमॉन गाईज……..आपल्या वेळेस गाईंचे अनेक वचन गाईज सांगायचे, पण शांत बसून अर्थ लावायला सुरुवात केली आणि दमून विचार करणंच सोडून दिले. आता नव्या पिढीची भाषा आत्मसात करायला हवी. नुसता कल्ला केला राव, राडा करून टाकला… फ्लाईंग टू लंडन ….काय धमाल केले बाप,…..बाप गायला रे नुसता…… बाप मी आपलं बापूडवाणी हा बाप शब्द मनातल्या मनात जुळवत राहिले. इतक्यात शेजारची छकुली आली. तिच्या हातावर मॅडमनी स्टार काढलेला होता… म्हणे स्टार मिळाल्यानंतर कल्ला केला नुसता. ‘आता हा वॉचमन कुठे उलथलाय’ असे हजारो शब्द त्या त्या प्रांतातले बोली भाषेतले ऐकले की आपल्या बालपणीपासून म्हातारपणापर्यंतच्या सगळ्या छटा अलगद बघायला मिळतात आणि ती ती माणसं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. आपण हीच तर भाषेची समृद्धी मानतो, जी भाषा त्या शब्दांमुळे त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर उभी करते. नवनवीन शब्दांना आत्मसात करते, ती भाषा कायम समृद्धच होत असते. मग आमची मराठी मागे कशी राहणार?








