क्रमक खेळाचे दर्शन घडविलेल्या अंतिम लढतीत 1-0 ने विजय, इंग्लंडचे स्वप्न भंगले
वृत्तसंस्था/ सिडनी
ओल्गा कार्मोनाच्या पहिल्या सत्रातील गोलाच्या जोरावर रविवारी इंग्लंडला 1-0 असे रोखून स्पेनने आपले पहिले महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. खेळाडूंच्या बंडखोरीनंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांनी हे यश मिळविलेले आहे. या विजयामुळे एकाच वेळी 17 वर्षांखालील, 20 वर्षांखालील आणि वरिष्ठ विश्वचषक विजेतेपद मिळवणारा स्पेन हा पहिला संघ बनला आहे. स्वीडनने यजमान ऑस्ट्रेलियाला 2-0 असे हरवून तिसरे स्थान पटकावले.
आतापर्यंतच्या नऊ महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धांतील स्पेन हा पाचवा विजेता आहे. पुऊष तसेच महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अशा दोन्ही स्पर्धा जिंकणारी केवळ दोन राष्ट्रे असून त्यात आता जर्मनीसह स्पेन समाविष्ट झाले आहे. अंतिम शिट्टी वाजल्यानंतर स्पॅनिश खेळाडूंनी एकच जल्लोष करतांना गोलच्या समोर एकमेकांवर उड्या मारल्या. चषक दिला जाईपर्यंत मैदानावर त्यांचे नृत्य चालू राहिले. इंग्लिश संघाचा 1966 नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये विश्वचषक परत आणण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यात संघ कमी पडला.
स्पेनचा संघ हा एक उत्कृष्ट संघ आहे. मला वाटते की, पहिल्या सत्रामध्ये आम्ही आमच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हतो. दुसऱ्या सत्रात आम्ही निश्चितपणे निकराची झुंज दिली, असे इंग्लंडची कर्णधार मिली ब्राइट म्हणाली. या पराभवामुळे मोठ्या प्रमाणात निराशा आली असल्याचे तिने सांगितले. आक्रमक खेळाचे दर्शन घडलेल्या या सामन्यात 29 व्या मिनिटाला कार्मोनाने डाव्या पायाने फटका हाणून गोल केला. हा सामन्यातील एकमेव गोल राहिला.
कार्मोनानेच स्वीडनवर 2-1 ने मिळविलेल्या उपांत्य फेरीतील विजयात महत्त्वाचा वाटा उचलताना 89 व्या मिनिटाला गोल केला होता. 2015 मधील कार्ली लॉईडनंतरची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत गोल करणारी ती पहिली खेळाडू बनली आहे. स्पेनला 68 व्या मिनिटाला आघाडी वाढविण्याची संधी होती, परंतु जेनी हर्मोसोचा पेनल्टीवरील फटका मेरी इर्प्सने निष्फळ ठरविला. तिने अचूक अंदाज लावत डावीकडे सूर मारून चेंडू रोखला.
गेल्या वर्षी खेळाडूंनी जवळपास बंडखोरी करूनही स्पेनने हे जेतेपद मिळविलेले आहे. त्यावेळी 15 खेळाडूंनी आपल्या मानसिक आरोग्यासाठी ते राष्ट्रीय संघापासून दूर जाणे पसंत करत आहेत, असे सांगितले होते. त्यापैकी ओना बाटले, आयटाना बोनमाटी आणि मारिओना कॅल्डेन्ते या तीन खेळाडू महासंघाशी समेट करून विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. दुसरीकडे, गेल्या उन्हाळ्यात मायदेशात युरोपियन स्पर्धा जिंकल्यानंतर इंग्लंडला जोर चढला होता. पण कर्णधार लीह विल्यमसन, फ्रॅन किर्बी आणि बेथ मीड या संघातील तीन सर्वोत्तम खेळाडूंचा गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात समावेश करता आला नव्हता.
इंग्लंडच्या प्रशिक्षक सरिना विगमन या दोन संघांना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचविणाऱ्या पहिल्या प्रशिक्षक बनल्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी नेदरलँड्सचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्यावेळी नेदरलँड्स अंतिम फेरीत अमेरिकेकडून 0-2 ने हरला होता. इंग्लंडची अंतिम फेरीपर्यंतची कामगिरी पाहता त्यांचे पारडे जड ठरण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली होती. उपांत्य फेरीत त्यांनी ाजमान ऑस्ट्रेलियावर 3-1 असा विजय मिळवला होता. तीन गोल आणि तीन गोलांसाठी साहाय्यासह संघाची सर्वोच्च स्कोअरर राहिलेल्या लॉरेन जेम्सला नायजेरियाच्या मिशेल अलोजीला पाडल्याबद्दल निलंबित केल्याने दोन सामने बाहेर बसावे लागले होते.
निलंबन संपून जेम्स अंतिम फेरीसाठी उपलब्ध असताना विगमनने एला टुनेला सुऊवातीपासून उतरविले आणि आणि चेल्सीची विंगर असलेल्या जेम्सचा दुसऱ्या सत्रामध्ये बदली खेळाडू म्हणून वापर केला. इंग्लंडच्या सर्वोत्तम संधींपैकी एक 16 मिनिटाला चालून आली होती. त्यावेळी लॉरेन हेम्पने फटकावलेला चेंडू क्रॉसबारवर आदळला. एका मिनिटानंतर सलमा पॅरालुएलोने गोल करण्यासाठी धाव घेतली, परंतु ती नीट फटका हाणू शकली नाही, तर इर्प्सने अल्बा रेडोंडोचा प्रयत्न उधळवून लावला. स्पेनच्या प्रशिक्षक जॉर्ज विल्डा यांनी 19 वर्षीय पॅरालुएलोला सुऊवातीपासून मैदानात उतरविले. मध्यांतरास काही सेकंद बाकी असताना पॅरालुएलोचा प्रयत्न थोडक्यात हुकून चेंडू गोलखांब्यावर आदळला. हेम्पला 54 व्या सामन्यात आणखी एक संधी मिळाली होती, परंतु तिचा फटका दिशाहीन ठरला. त्यानंतर एका मिनिटाने तिला फाऊलसाठी ‘पिवळे कार्ड’ दाखविण्यात आले.
इर्प्सला ‘गोल्डन ग्लोव्ह’, बोनमतीला ‘गोल्डन बॉल’

स्वीडनविऊद्ध पॅरालुएलोला गोल केला होता आणि उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सवर अतिरिक्त वेळेत तिने केलेला गोल स्पेनला विजय मिळवून देणारा ठरला होता. या कामगिरीमुळे तिला स्पर्धेतील युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला, तर स्पेनच्या इर्प्सने सर्वोत्कृष्ट गोलरक्षकासाठीचा ‘गोल्डन ग्लोव्ह’ आणि बोनमतीने विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठीचा ‘गोल्डन बॉल’ जिंकला.









