वृत्तसंस्था/बटुमी, जॉर्जिया
ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी येथे होणाऱ्या क्वार्टरफायनलमध्ये चीनच्या युक्सिन सॉन्गचा सामना करताना फिडे महिला विश्व बुद्धिबळ चषक स्पर्धेचे पहिले विजेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने दमदार दावेदार म्हणून सुऊवात करेल. भारताची सर्वोच्च मानांकित महिला खेळाडू आणि अनेक प्रमुख जागतिक स्पर्धांमध्ये विजेती ठरलेली हम्पी ही दिव्या देशमुख, डी. हरिका आणि आर. वैशालीसह अंतिम आठ खेळाडूंमध्ये पोहोचली आहे.
एकाच देशाच्या चार खेळाडूंनी स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. डी. हरिका दिव्या देशमुखचा सामना करणार असल्याने उपांत्य फेरीत किमान एका भारतीय खेळाडूचे स्थान निश्चित झाले आहे. दरम्यान, आर. वैशालीसमोर सर्वांत कठीण आव्हान आहे. कारण ती दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये माजी महिला विश्वविजेती चीनच्या टॅन झोंगयीचा सामना करेल. तसे पाहिल्यास या उच्चस्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जास्तीत जास्त तीन भारतीय खेळाडू पोहोचू शकतात. या स्पर्धेतून पुढील महिला कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळविता येणार आहे.
त्यादृष्टीन सर्वांचे लक्ष हम्पीवर असेल, जी या स्पर्धेत पुन्हा फॉर्ममध्ये आली आहे. टायब्रेकरच्या शेवटच्या फेरीत स्वित्झर्लंडची माजी विश्वविजेती अलेक्झांड्रा कोस्टेनियुकवर तिने मिळविलेला विजय अधोरेखित करतो की, 38 वर्षांची असली, तरी ती एक जबरदस्त शक्ती आहे. भारताची दुसरी महिला ग्रँडमास्टर डी. हरिका ही एक अनुभवी खेळाडू आहे. तिने यापूर्वी दोनदा महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मागील फेरीच्या टायब्रेकरमध्ये चीनच्या दुसऱ्या मानांकित झू जिनरला पराभूत करून या स्पर्धेतील जायंट-किलर म्हणून उदयास आलेल्या दिव्याविऊद्ध तिची खेळण्याची शैली आणि दबावाला तोंड देण्याची क्षमता यांची कसोटी लागेल. गेल्या महिला ग्रँड स्विसची विजेती आणि 2024 मध्ये कँडिडेट्स क्वालिफायर ठरलेली आर. वैशाली टॅन झोंगयीविऊद्ध एक महत्त्वाचा सामना खेळणार आहे. अन्य क्वार्टरफायनलमध्ये चीनची टिंगजी लेई जॉर्जियाच्या नाना डझाग्निडझेशी लढेल.









