वृत्तसंस्था/ दुबई
बांगलादेशमध्ये होणारी महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा आता संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याचा निर्णय आयसीसीने मंगळवारी घेतला आहे. बांगलादेशमधील अस्थिर वातावरणामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.
ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. बांगलादेशकडेच स्पर्धेचे यजमानपद राहणार असून दुबई व शारजाह येथे यातील सामने खेळविले जातील. यजमानपद राहिल्यामुळे महसुलातील वाटा बांगलादेशला मिळणार आहे. ‘बांगलादेशमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकत नाही, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळ या स्पर्धेचे संस्मरणीय आयोजन करू शकते, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे,’ असे आयसीसीचे प्रमुख कार्यकारी जेफ अॅलरडाईस यांनी म्हटले आहे. पण त्यांनी बांगलादेशमध्ये सुरू असलेला हिंसाचार व तणाव यांचा थेट उल्लेख करण्याचे टाळले.
बीसीबीने ही स्पर्धा आयेजित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांनी तेथे खेळणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र बीसीबीकडे यजमानपदाचे हक्क कायम राहतील. स्पर्धेचे केंद्र बदलण्याआधी हेही सीईओनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलीसा हिलीने बांगलादेशमधील स्थितीवरून चिंता व्यक्त केल्यानंतर आयसीसीने त्यावर त्वरित निर्णय घेतला. यूएईने स्पर्धा आयोजनाची तयारी दर्शविल्याबद्दल तसेच लंका व झिम्बाब्वे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल अॅलरडाईस यांनी त्यांचेही आभार मानले.









