राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महिलांच्या मनात आजही त्यांच्या सुरक्षेसंबंधी अनिश्चिततेची भावना असणे हे दुर्दैवी आहे. एक समाज म्हणून आपण साऱ्यांनी अंतर्मुख होऊन या परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेचे महत्व समाजाने पटवून घेणे आवश्यक असून त्यादिशेने समाजाचे प्रबोधन व्हावयास हवे, असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेच्या ‘शीशक्ती’ नामक कार्यक्रमाला पाठविलेल्या संदेशात हे विचार व्यक्त केले.
भारतातील महिलांनी नेहमीच सहनशक्ती, सामर्थ्य आणि साहस यांचा परिचय दिलेला आहे. भारताचे खरे सामर्ध्य महिलांच्या सबलीकरणातच आहे. महिलांनी आजवर त्यांच्या मार्गात आलेले प्रत्येक अडथळे पार करुन प्रगतीचा मार्ग स्वीकारलेला आहे. समाजाने त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. महिलांचा सन्मान करण्याची सवय समाजात रुजविण्यासाठी तशा प्रकारचे प्रबोधन झाले पाहिजे. महिलांची समस्या अशी आहे की, त्यांना नेहमीच समाजाच्या संकुचित वृत्तीशी लढावे लागते, असे प्रतिपादन द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे.
राष्ट्राच्या यशासाठी…
कोणत्याही राष्ट्राच्या यशासाठी महिलांचा सन्मान आणि सुरक्षा या महत्वाच्या बाबी असतात. त्यामुळे या दोन बाबी सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. भारताच्या सहस्रावधी वर्षांच्या परंपरेत महिलांना एक विशेष आणि सन्मानाचे स्थान आहे. भारतवर्षाचा उल्लेखही आपण ‘भारतमाता’ असा करतो. आपल्या संस्कृतीत महिलांना एक विशिष्ट उच्च स्थान आणि पावित्र्य देण्यात आले आहे. आपल्या देवताही विविध रुपांमधील आहेत. एकीकडे त्या दुष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी हाती शस्त्र धारण करतात आणि दुर्गा बनतात तर दुसरीकडे त्या लक्ष्मी आणि सरस्वतीच्या रुपांमध्ये संपत्ती, ज्ञान आणि शांतीच्या प्रतीकही बनतात. आज महिलांनीही अशा देवतांचा आदर्श पाळण्याची आवश्यकता आहे. महिला या खऱ्या अर्थाने सर्व प्रकारच्या शक्तीचे मूर्त स्वरुप आहेत, अशी भलावण त्यांनी केली.
समाजस्वास्थ्यासाठी महिलांचा सन्मान
समाज स्वास्थ्यासाठी महिलांचा सन्मान होणे आवश्यक असते. अनेक महिलांनी त्यांच्यावर असलेली बंधने आणि घातलेल्या मर्यादा पार करुन प्रगती साधलेली आहे. तसेच उच्च स्थाने स्वत:च्या बुद्धीने आणि प्रयत्नाने मिळविलेली आहेत. समाजाने त्यांच्या प्रयत्नांची बूज राखण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.









