सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मांडले ठाण : अधिकाऱयांना धरले धारेवर
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरात 22 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अधिकाऱयांकडे अनेकवेळा विनंती अर्ज केला. पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी बुधवारी दुपारी कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली. सुरळीत पाणीपुरवठा करा अन्यथा येथेच ठाण मांडू, अशी भूमिका घेतली.
कॅन्टोन्मेंटने पाणीपुरवठÎात कपात केली होती. उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. सध्या पावसाचा जोर वाढला असून राकसकोप जलाशय पूर्णपणे भरले आहे. तरीदेखील कॅन्टोन्मेंट परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. राकसकोप जलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून यापूर्वी पाणी कपात करण्यात आले. पण आता पाणीसाठा मुबलक असूनही पाणी कपात करण्यात आल्यामुळे संतापलेल्या महिलावर्गाने थेट कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद अनुपस्थित होते. त्यामुळे साहाय्यक कार्यकारी अभियंते सतीश मण्णूरकर यांना घेराव घालण्यात आला. पाणीपुरवठा कधी सुरळीत करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. घरपट्टी-पाणीपट्टी वेळेवर भरली जाते, तरी 22 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. असे विविध प्रश्न उपस्थित करून अधिकाऱयांना धारेवर धरले. मण्णूरकर यांनी समर्पक उत्तर दिले नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना बोलवा, अशी मागणी केली.
सर्व महिला कार्यालयात ठाण मांडून बसल्या असता मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद दाखल झाले. त्यामळे महिलांनी के. आनंद यांना घेराव घालून पाणी समस्येबाबत तक्रारी केल्या. 22 दिवसांपासून पाणीपुरवठा केला नाही. पाणीपुरवठा करण्याची वेळ निश्चित नाही. कोणत्याहीवेळी पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलावर्गाचे हाल होत आहेत. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. घरात लहान मुले असून काहींच्या घरी वृद्ध नागरिक आहेत. अशा स्थितीत पाण्यासाठी कुठे जायचे? असा मुद्दा उपस्थित करून तक्रारींचा भडिमार केला. तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा येथेच ठाण मांडू, असा इशारा दिला.
जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढू, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी केला. पण महिलांनी काहीच ऐकले नाही. पाणीपुरवठा कधीपासून सुरळीत करणार सांगा, असा जाब विचारला. बिलाची रक्कम थकली असल्याने महापालिका व एल ऍण्ड टी कंपनीने पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून पाणीसमस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.
पण यावर महिलावर्गाचे समाधान झाले नाही. पाण्यासाठी आम्हीदेखील जिल्हाधिकाऱयांना भेटू, अशी भूमिका घेऊन गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय महिलांनी घेतला. मोठ्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.










