वृत्तसंस्था/ मुंबई
पहिल्या महिला प्रीमियर लीगचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या शानदार सोहळ्याने झाला. यावेळी बॉलीवुडमधील अभिनेत्री कियारा अडवाणी, क्रिती सेनॉन यांनी आणि पंजाबी गायक तसेच रॅपर ए. पी. धिल्लाँ यांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले.

मंदिरा बेदीने या सोहळ्याची सुरुवात केल्यानंतर कियारा अडवाणीने व्यासपीठावर येत ‘रंगी सारी’, ‘बिजली’ अशा गाण्यांवर पदन्यास केला. त्यानंतर कृती सेनॉनने दाखल होत विविध गाण्यांवर नृत्ये सादर केली. मग धिल्लाँने ‘ब्राऊन मुंडे’सह आपल्या विविध गाण्यांनी प्रेक्षकांना रिझविले. त्यानंतर तिन्ही कलाकारांनी एकत्र येत या सोहळ्याचा शेवट केला.
यानंतर महिला प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेल्या पाचही संघांच्या कर्णधारांना व्यासपीठावर बोलावून स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. यामध्ये मेग लॅनिंग, बेथ मुनी, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, अॅलिसा हिली यांचा समावेश राहिला. यावेळी बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, अरुण धुमाळ, उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेही हजर होते.









