वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी यांच्याकडे प्रिमियर लीग समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेला अधिक प्रोत्साहन आणि प्रचंड प्रतिसाद मिळावा यासाठी रॉजर बिन्नी यांच्या नेतृत्त्वाखाली 8 सदस्यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी राहणार असून बीसीसीआयचे सचिव जय शहा हे महिलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे निमंत्रक राहतील. या समितीमध्ये आयपीएलचे प्रमुख अरुण धुमल, राजीव शुक्ला, आशिष शेलार, देवजीत साकीया, मधुमती लेले, प्रभा तेज भाटिया यांचा समावेश आहे. 2024 च्या महिलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईत क्रिकेटपटूंचा लिलाव शनिवार दि. 9 डिसेंबरला होणार आहे. तथापि दुसऱ्या महिलांच्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेतील सामन्यांची ठिकाणे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत.









