बेळगाव : काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या मोफत बस प्रवासाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद वाढू लागला आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांपैकी पहिली योजना रविवारपासून सुरू केली. महिलांना मोफत बस प्रवास मिळत असल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातूनदेखील महिला प्रवाशांनी बसेस भरून येऊ लागल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानक, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, गोवावेस, आरपीडी कॉर्नर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, आरटीओ सर्कल यासह इतर ठिकाणी असलेल्या बसथांब्यांवर महिलांचीच संख्या अधिक दिसू लागली आहे. सरकारने महिला आणि विद्यार्थिनींनादेखील मोफत बसची मुभा दिली आहे. त्यामुळे तरुणींची संख्यादेखील वाढू लागली आहे. महिलांबरोबरच विद्यार्थिनींनादेखील प्रवास करणे सोयीस्कर होऊ लागले आहे.
ओळखपत्राबाबतचा संभ्रम दूर
काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी आश्वासने दिली होती. त्यातील पहिली गॅरंटी योजना रविवारपासून राज्यात सुरू झाली आहे. शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. केवळ एखादे ओळखपत्र दाखवून महिलांना प्रवासाची मुभा दिली आहे. मूळ ओळखपत्र नसल्यास झेरॉक्स प्रत किंवा मोबाईलमधील डीजी लॉकरमध्ये असलेले कोणतेही ओळखपत्र दाखवून प्रवास करता येणार आहे, असे परिवहनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महिलांचा ओळखपत्राबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. बेळगाव आगारातून दैनंदिन निपाणी, चिकोडी, हुक्केरी, रामदुर्ग, सौंदत्ती, अथणी, बैलहोंगल, बागलकोट, विजापूर, खानापूर, संकेश्वर यासह इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्यांना हा लाभ घेता येत आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रवाशांनादेखील या मोफत बसप्रवासाचा लाभ होऊ लागला आहे. राज्यात सार्वजनिक बसच्या माध्यमातून कोठेही प्रवास करता येत आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे आणि इतर ठिकाणी भेटी देणाऱ्या महिलांची संख्या वाढणार आहे. शहर आणि ग्रामीण भागातील महिलांना मोफत बससेवेचा लाभ होऊ लागला आहे. लग्न समारंभ, यात्रा-जत्रा आणि इतर कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या महिला मोफत बसप्रवासाचा लाभ घेऊ लागल्या आहेत. शिवाय दैनंदिन नोकरदार, कामगार आणि इतर व्यावसायिक महिलादेखील बसने प्रवास करू लागल्या आहेत. त्यामुळे एकूणच बसने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे.









