वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय हॉकीचे पुन्हा एकदा रांचीमध्ये पुनरागमन झाले असून महिलांची हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रांचीमध्ये होणार आहे. 13 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
आधीच्या नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा चांगझाऊ, चीन येथे होणार होती. पण चिनी महिला संघाने आशियाई स्पर्धेत जेतेपद पटकावत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळविल्याने तेथून ही स्पर्धा हलविण्यात आली आहे. भारताशिवाय या स्पर्धेत सात अन्य देशांचे संघ सहभागी होत असून पहिले तीन स्थान पटकावणारे संघ पुढील वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
या संदर्भात बोलताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले की, ‘आमच्या खेळाडूंसाठी ही मोठी स्पर्धा ठरणार असून ती आमच्या भूमीत होणार असल्याने आम्ही रोमांचित झालो आहोत. कारण स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार असल्याने भारतीय खेळाडू अधिक जोमाने खेळू शकतील आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा ते निश्चितच प्रयत्न करतील. मागच्या वेळेप्रमाणे आपला संघ पात्रता मिळवेल अशी आशा वाटते. 2019 मध्ये भुवनेश्वरमध्ये झालेल्या दोन सामन्यात अमेरिकेवर विजय मिळवित भारतीय महिलांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली होती,’ असेही ते म्हणाले.
अलीकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र भारतीय महिलांना उपांत्य फेरीत चीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता, त्याची सर्वांनाच चिंता लागली आहे. मात्र जपानला 2-1 असे हरवून भारताने कांस्यपदक मिळविले असले तरी उपांत्य लढतीतील नीरस खेळ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्यांचे कसे प्रदर्शन होते, हे पहावें लागेल. ही स्पर्धा आशियाई क्रीडा स्पर्धेसारखीच असून जपान, चीन, कोरिया, मलेशिया व थायलंड या संघांविरुद्धच त्यांचे सामने होणार आहेत.
ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेआधी भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याची संधी प्रशिक्षक यानेक स्कॉपमन यांना मिळणार आहे. यातून त्यांना कच्च्या दुव्यावर काम करून सुधारण करता येणार आहे. रांचीतील हॉकीप्रेमींनाही जगातील काही उत्तम संघांचा खेळ पाहण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. हॉकी इंडिया लीगनंतर येथील चाहत्यांना अव्वल दर्जाची हॉकी स्पर्धा पहायला मिळाली नव्हती. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होणारी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा ही त्यांच्यासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे









