29 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या अवधीत होणार सामने
वृत्तसंस्था/ दुबई
यावर्षी होणारा महिलांच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन भारतात 29 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना मुल्लनपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील सामने विशाखापटणम, थिरुवनंतपूरम, रायपूर, इंदोर येथेही खेळविले जाणार आहेत, असे वृत्त एका क्रीडा वाहिनीने दिले आहे.
यापैकी फक्त विशाखापटणममध्ये याआधी महिलांचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला होता. एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर 2014 मध्ये महिलांचा शेवटचा सामना आयोजित करण्यात आला आहे. या मैदानावर महिलांचे एकूण सहा टी-20 व पाच वनडे सामने खेळविण्यात आले होते. इंदोरमधील नेहरू स्टेडियमवर महिला विश्वचषकातील दोन सामने आयोजित करण्यात आले होते. पण त्यानंतर होळकर स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत आहेत.
यजमान भारताने याआधीच वनडे वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळविले असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व लंका यांनीही स्पर्धेत स्थान मिळविले आहे. आणखी दोन संघ महिला वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेनंतर निश्चित होणार आहेत. ही पात्रता स्पर्धा पाकमधील लाहोरमध्ये 9 एप्रिलपासून होणार आहे. सहा संघांचा सहभाग असलेल्या या पात्रता स्पर्धेतून पाकिस्तान वर्ल्ड कपसाठी पात्र ठरल्यास त्यांचे सामने संयुक्त अरब अमिरात किंवा लंकेमध्ये खेळविले जातील. बीसीसीआय व पीसीबी यांच्यामध्ये अलीकडेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी तसा करार झाला आहे. पात्रता स्पर्धेत बांगलादेश, विंडीज, पाक, आयर्लंड यांच्यासह स्कॉटलंड व थायलंड संघ खेळणार आहेत.
2013 नंतर भारतात प्रथमच महिलांच्या वनडे वर्ल्ड कपचे आयोजन होत आहे. 2013 मध्ये यजमान भारताला प्राथमिक फेरीही पार करता आली नव्हती. त्यानंतर 2016 मध्ये भारताने महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धाही आयोजित केली होती.
यावर्षीच्या स्पर्धेतही आठ संघांत 31 सामने होणार आहेत. भारताला अजून एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2017 मध्ये भारताने उपविजेतेपद मिळविले होते, हीच भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. मिथाली राज व झुलन गोस्वामी या महान खेळाडूंशिवाय भारतीय संघ प्रथमच वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे.









