वृत्तसंस्था /राऊरकेला (ओडिशा)
येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर मंगळवारपासून हॉक इंडियाच्या 13 व्या कनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होणार असून या स्पर्धेत एकूण 28 संघांचा समावेश आहे.या स्पर्धेत सहभागी होणारे 28 संघ 8 गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल. आतापर्यंत दोन वेळेला ही स्पर्धा जिंकणाऱ्या हरियाणाचा अ गटात समावेश असून या गटात बंगाल आणि तेलंगणा यांचाही सहभाग आहे. गेल्यावर्षी या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा झारखंडचा संघ ब गटात असून राजस्थान आणि आसाम यांचाही या गटात समावेश आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविणाऱ्या ओडिशा संघाचा क गटात समावेश असून तामिळनाडू आणि मणिपूर यांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ यांचा ड गटात, कर्नाटक, मध्यप्रदेश, पुडूचेरी आणि जम्मू-काश्मिर यांचा ई गटात तर चंदीगड, मिझोरम, बिहार, दादरा आणि नगरहवेली, दमण-दीव यांचा फ गटात तर मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश व गोवा यांचा च गटात समावेश आहे. या स्पर्धेत मंगळवारी कर्नाटक आणि जम्मू-काश्मिर यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.









