महिला माजी सर्व पंचसदस्य तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान : विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे
वार्ताहर मडकई
मडकई मतदारसंघातील महिलांमध्ये अनेक विषयांवर जागृती घडवून आणण्यासाठी तसेच त्यांच्या विचाराना चालना देण्यासाठी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 10 वा. तळावलीच्या महालक्ष्मी इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर हा मेळावा होणार आहे. गोवा मुक्तीनंतर गोव्याच्या पंचायत व जिल्हा पंचायत सदस्य निवडणुकीत आजपर्यंत निवडून आलेल्या सर्व महिलांचा तसेच विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती माधवराव ढवळीकर ट्रस्टचे अध्यक्ष मिथील ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जागतिक महिला दिन बुधवार दि. 8 रोजी साजरा करण्यात आला. त्याच दिवशी फोंड्यात शिमगोत्सव असल्याने महिला मेळावा घेता आला नाही. गोवा मुक्तीनंतर स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी विकासाची क्रान्ती घडवून आणली. शैक्षणिक क्षेत्रातल्या क्रान्तीमूळे महिला शिकू शकल्या. विविध क्षेत्रात त्यांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले. भाऊंच्या कन्या स्व. शशिकलाताई काकोडकर गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. म्हणून स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून महिला मेळावा मंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला आहे. त्यांच्याच विचारधारेतून रविवारी 12 मार्च रोजी महिला सशक्तीकरण मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मगो पक्ष, माधवराव ढवळीकर ट्रस्ट व कवळे बांदोडा सेल्फ हेल्फ ग्रुप फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कर्करोगतज्ञ डॉ. अनुपमा बोरकर उपस्थित असतील. अत्यंत घातक असलेल्या कर्क रोगावर त्यांचे विचार महिलासाठी प्रेरणादायी ठरतील, असे पूढे बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी बांदोडा पंचायतीचे पंचसदस्य वामन नाईक, कवळे पंचायतीचे माजी सरपंच राजेश कवळेकर, पंचसदस्य रामचंद्र नाईक, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक उपस्थित होते. फोंडा उपजिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर या निमंत्रित पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. सर्वसाधारण रोगापासून कुंटूंबातील सदस्यांना कसे दूर ठेवावे या विषयावर त्या माहिती देतील. कुंटूंबात व समाजात शांती व समृध्दी आणि महिलांना दिशा देण्यासाठी अध्यात्म क्षेत्र कसे सक्षम आहे. यावर समाजसेविका ज्योती सुदिन ढवळीकर मार्गदर्शन करतील. आमदार तथा मंत्री सुदिन ढवळीकर, कवळे बांदोडा सेल्फ हेल्फ ग्रुप फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा काणकोणकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, ट्रस्टी मिथील ढवळीकर आदी व्यासपिठावर उपस्थित असतील. सकाळच्या सत्रात उद्घाटन तसेच विविध विषयांवर जागृती, माजी पंचसदस्यांचा सन्मानसोहळा होईल. सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होईल. महिलांनी मोठ्यासंख्dयोने मेळाव्याला उपस्थिती लावावी, असे आवाहन मिथील ढवळीकर यांनी केले आहे.









