पाणीप्रश्न सुरळीत करण्याची मागणी
वार्ताहर/येळ्ळूर
येत्या चार दिवसांत गल्लीतील नळाला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास रास्तारोको करण्याचा इशारा मारुती गल्ली-येळ्ळूर येथील महिलांनी ग्राम पंचायतीसमोर काढलेल्या मोर्चादरम्यान दिला. पण गाऱ्हाणे कोणासमोर मांडावे हा प्रश्न अध्यक्ष व सदस्य उपस्थित नसल्याने आणि पीडीओ रजेवर असल्याने त्यांना पडला. त्यामुळे त्यांचे म्हणणे सेक्रेटरी मराठे यांनी ऐकून घेतले व पीडीओंच्या कानावर घालण्याचे आश्वासन दिले. दरम्यान. ग्रा. पं. अध्यक्षांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन न घेतल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली.
महिन्याभरात गल्लीतील नळाला नियमित व सुरळीत पाणी येत नसल्याने प्रभाग सदस्यांना भेटून सांगण्यात आले होते. पण सदस्यांनी कानाडोळा केल्यामुळे महिलांनी ग्राम पंचायतीसमोर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या आधी दोनच दिवसांपूर्वी चांगळेश्वरी गल्लीतील महिलाही सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. गल्लीगल्लीत तीनतीन नळ आहेत. पण त्या नळातून कीतपत पाणी पुरवठा होतो याकडे ग्राम पंचायतीचे व सदस्यांचे लक्ष नाही. तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याचे महिला वर्गाने यावेळी सांगितले.
चोवीस तास पाणी देण्याचे स्वप्न दाखवत लाखो रुपयांचे खर्च करून जलजीवन मिशन, पाणी योजना राबविण्यात आली. योजना पूर्ण झाली पण स्वप्नाइतके पाणी मिळाले नाही. योजना पूर्ण होऊनही ती ग्राम पंचायतीने ताब्यात घेतली नाही. घेतली असेल तर मग पाणी कुठे मुरते आणि का मुरते याचा पाठपुरावा करणेही गरजेचे आहे. पाण्याच्या व्यवस्थापनेनुसार गल्ल्यांना एक, दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पाणी व्यवस्थापनात ढिसाळपणा आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापणेसाठी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी व समस्या दूर करावी, अशी मागणी महिला वर्गाने केली.









