951 कोटी रुपयांना विक्री, पाच वर्षांचा कालावधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी महिला आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणाचे अधिकार व्हायकॉम 18 या कंपनीने पटकाविले आहेत, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली आहे. या अधिकारांच्या विक्रीचा लिलाव या कंपनीने जिंकला असून ही विक्री पाच वर्षांच्या कालावधीसाठी 951 कोटी रुपयांनी झाली आहे.
सोमवारी हा लिलाव मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. ही स्पर्धा येत्या मार्चमध्ये होण्याची शक्यता असून प्रथमच तिचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाच संघ भाग घेणार असून त्यांच्यातील सर्व सामने मुंबईतच होणार आहेत. प्रसारणाचे अधिकार तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहेत. लिनीयर (टीव्ही), डिजिटल तसेच डिजिटल आणि संयुक्त (टीव्ही आणि डिजिटल) अशा या तीन श्रेणी आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
महिला क्रिकेट लोकप्रिय
अलिकडच्या काळात महिला क्रिकेट मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय होत आहे. नुकतीच संपलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका या लोकप्रियतेचे मोठे उदाहरण आहे. त्यामुळे महिलांसाठी आयपीएल स्पर्धा आयोजित करणे हे क्रिकेट नियामक मंडळाचे कर्तव्यच होते. यामुळे महिला क्रिकेटप्रेमींना अधिक प्रमाणात या क्रिकेटचा आनंद अनुभवता येईल, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी केले आहे. प्रसारण अधिकारांचे शुल्क प्रत्येक सामन्यासाठी 7.09 कोटी इतके राहणार आहे. महिला क्रिकेटचा सर्वदूर प्रसार करण्यामध्ये या प्रसारण कंपनीचे महत्वाचे योगदान राहणार आहे. प्रसारण अधिकारांच्या लिलावाला मिळालेला प्रतिसाद पाहता, महिला क्रिकेटचा प्रवास योग्य दिशेने होत आहे, हे दिसून येते. आम्ही व्हायकॉम 18 चे हा लिलाव जिंकल्याबद्दल अभिनंदन करतो. ही स्पर्धा यशस्वी ठरेल, असे प्रशंसोद्गार मंडळाचे सचिव जयेश शहा यांनी काढले.
पुरुषांच्या स्पर्धेचा लिलावही…
पुरुषांच्या आयपीएल डिजिटल प्रसारणाचा लिलावही व्हाय
कॉम 18 ने 23,758 कोटी रुपयांना जिंकला होता. तर या स्पर्धेचा टीव्ही प्रसारणाचा लिलाव डिस्ने स्टार कंपनीने 23,575 कोटी रुपयांचे मोल मोजून आपल्याकडे राखला होता. हे लिलाव गेल्या जूनमध्ये झाले होते, असेही स्पष्ट करण्यात आले.









