वार्ताहर/कुडाळ
आजही लोकांमध्ये मनुस्मृतीचा पगडा आहे. स्त्रियांना आपले प्रश्न मांडता आले पाहिजेत. प्रश्न विचारताना स्त्रियांचा बौद्धिक स्तर वाढला पाहिजे. चूल आणि मूल ही भावना आजही आपल्याकडे आहे. आजही स्त्रियांना स्वातंत्र्य दिले जात नाही. मनुस्मृती ही जन्मदृष्टी व्यवस्थेला प्रभाव मानते तर संविधान हे गुणादृष्टी व्यवस्थेला प्रभाव मानते.त्यामुळे स्वतःचे निर्णय घेण्यासाठी मनुस्मृती नको, तर संविधान महत्त्वाचे आहे, असे मत मनुस्मृती व संविधान यांचा अभ्यास असणाऱ्या विचारवंत व स्त्रीवादी नेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद (सिंधुदुर्ग) च्यावतीने ‘मनुस्मृती नको-संविधान हवे’ विचार मंथन कार्यशाळा येथील महालक्ष्मी सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उदघाटन सकाळच्या पहिल्या सत्रात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अँड संध्या गोखले होत्या.अँड असुन्ता पारधे, प्रा. कामाक्षी भाटे, डॉ. रेखा म्हाडेश्वर, डॉ. अनुराधा रेड्डी, शमा दलवाई, सुजाता गोठोसकर, महिला नेत्या कमलताई परुळेकर,संध्या म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा संघटक श्रेया परब, तालुका अध्यक्ष राजन नाईक,अतुल बंगे आदी उपस्थित होते.









