वृत्तसंस्था/ होंगझाऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त सुरुवात करताना पहिल्याच सामन्यात सिंगापूरचा 13-0 असा धुव्वा उडवला. भारताच्या संगीता कुमारीने (23, 47 व 53 वे मिनिट) गोल्सची हॅटट्रिक केली. तर, नवनीत कौरने (14 व 15 वे मिनिट) दोन गोल केले. याव्यतिरिक्त दीपिका (11 वे मिनिट), सुशिला चान (8 वे मिनिट), उदिता (6 वे मिनिट), नेहा (19 वे मिनिट), दीप ग्रेस एक्का (17 वे मिनिट), सलीमा टेटे (35 वे मिनिट), वंदना कटारिया (56 वे मिनिट) आणि मोनिका (52 वे मिनिट) या सर्वांनी एक-एक गोल केला. आता, भारतीय महिलांचा दुसरा सामना शुक्रवारी मलेशियाविरुद्ध होईल. विशेष म्हणजे, भारतीय महिलांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारताना आपणच सुवर्णपदकाच्या शर्यतीत आहोत, हे दाखवून दिले.
सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात सिंगापूरला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. पहिल्या पंधरा मिनिटांमध्येच भारत 5-0 असा आघाडीवर होता. यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने आणखी तीन गोल करत आपली आघाडी 8-0 अशी केली. यामुळे मध्यंतरापर्यंत भारताकडे ही आघाडी कायम होती. यानंतर सिंगापूरने चांगली टक्कर दिली.
तरीही भारताने आणखी तीन गोल केले. त्यानंतर तिसऱ्या सत्रात एक व चौथ्या सत्रात चार गोल करत भारताने 13-0 अशी भक्कम आघाडी घेतली. विशेष म्हणजे, सिंगापूरला संपूर्ण मॅचमध्ये गोल करण्याची संधी न देता भारताने 13-0 अशा फरकाने ही मॅच खिशात घातली.









