वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये रविवारपासून वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण हॉकी शिबिराला प्रारंभ झाला असून या शिबिरात निवडण्यात आलेल्या 65 महिला हॉकीपटू दाखल झाल्या आहेत. पंचकुला येथे अलिकडेच झालेल्या हॉकी इंडियाच्या 15 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेत हॉकी शिबिराकरता 65 महिला हॉकीपटूंची निवड करण्यात आली. पंचकुलातील झालेल्या स्पर्धेचे जेतेपद झारखंडने पटकाविताना अंतिम सामन्यात हरियाणाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला होता.
सराव शिबिरासाठी आसाम, चंदीगड, हिमाचलप्रदेश, बंगाल, उत्तरप्रदेश, झारखंड, कर्नाटक, पंजाब, मणिपूर, केरळ, मध्यप्रदेश, ओडिशा, मिझोराम, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि केंद्रीय राखिव पोलिसदल संघातील महिला खेळाडूंची निवड करण्यात आली. बेंगळूरच्या या सराव शिबिरात भारतीय महिला हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेसाठीच्या पुढच्या टप्प्यासाठी सराव शिबिराकरीता संभाव्य महिला हॉकीपटूंपैकी 40 सदस्यांची निवड केली जाणार आहे. महिलांची प्रो-लीग हॉकी स्पर्धा 31 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान होणार आहे.









