जलजीवन योजनेचे पाणी त्वरित न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्राम पंचायतीने पाण्याचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकर गल्लीतील महिलांनी बुधवारी ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढून पंचायतीच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र काही ग्राम पंचायतींच्या योग्य नियोजनाअभावी निधी वाया गेला आहे. काही ठिकाणी पाणीच जात नाही. असाच प्रकार अगसगेतील अंबेडकर गल्लीमध्ये घडला आहे. मोजक्याच ठिकाणी पाणी जाते. काही ठिकाणी पाणीच जात नाही. यामुळे महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याबाबत ग्राम पंचायतीला वारंवार कळवूनदेखील दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंबेडकर गल्लीतील नागरिकांनी केला आहे. जलजीवन मिशन योजनेचे पाणी त्वरित मिळावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पंचायत अभिवृद्धी अधिकारी एन. ए. मुजावर यानी पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले. सध्या पाण्याची टंचाई असल्याने ग्राम पंचायतीने टँकरने पाणी पुरवावे. अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
दोन दिवसात पाणी सुरळीत करण्याचे आश्वासन
गेल्या काही वर्षापासून आंबेडकर गल्लीतील काही घराना पाणीपुरवठा होत नाही. कारण गल्लीमध्ये चढउतार असल्यामुळे मधल्या घराना पाणी जात नाही. याना पाणी मिळावे म्हणून ग्राम पंचायतीमध्ये आपण प्रयत्न करीत आहोत. दोन दिवसामध्ये व्हॉल्व्ह बसवून त्याना जलजीवन मिशन (जे. जे. एम) चे पाणी मिळवून देऊ असे आश्वासन ग्राम पंचायत सदस्य गुंडू कुरेन्नवर यांनी दिले.
दोन कूपनलिकांचे पाणीच नाही
मागासवर्गीय अनुदानातून गावामध्ये तीन कूपनलिका खोदाई करण्यात आल्या आहेत. एक कूपनलिका आंबेडकर गल्लीमध्ये केली असून या एकाच कूपनलिकेचे पाणी आंबेडकर गल्लीमध्ये सोडण्यात येते. तर गावच्या वेशीमध्ये एक कूपनलिका आणि दुसरी पाटील गल्लीमध्ये खोदाई केली आहे. मात्र या दोन्ही कूपनलिकेचे पाणी आंबेडकर गल्लीमध्ये ग्राम पंचायत सोडत नाही. या दोन्ही कूपनलिका मागासवर्गीय अनुदानातून खोदाई केली आहे. याचे पाणी आंबेडकर गल्लीमध्ये सोडावे आणि पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी सेफवार्ड समुहाचे अध्यक्ष संतोष मेत्री व यल्लाप्पा मेत्री यांनी केली आहे.









