पाणीपुरवठा न केल्यास खानापूर महामार्ग रोखणार
वार्ताहर/मजगाव
मजगाव व उपनगरांतील महिलांनी गुरुवारी हातात घागरी घेऊन मजगाव मुख्य रस्त्यावर थांबून रास्ता रोको केला. प्रसार माध्यमांना बोलावून सविस्तर माहिती दिली व चार दिवसांत नळपाणी पुरवठा सुरू झाला नाही तर खानापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पट्टण यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या दीड महिन्यांपूर्वी बेम्को क्रॉसनजीक बेसमेंटसाठी खोदाई केल्याने तेथील पाईपलाईनसह कांही भाग कोसळल्याने सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मजगाव, उद्यमबाग, कलमेश्वरनगर, गजानननगर, संत ज्ञानेश्वरनगर, संगोळ्ळी रायण्णा नगर, राजाराम नगर, देवेंद्रनगर, ब्रह्मनगर, महावीरनगर, हनुमानवाडी व इतर उपनगरांचे पिण्याचे पाणी बंद होऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल पाहणी केली, पण अद्याप याकडे लक्ष दिले नाही. एलअॅण्डटी कंपनीमार्फत नाममात्र पिण्याच्या पाण्याचे टँकर्स कधीतरी केंव्हाही येत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा खानापूर महामार्गावर चार दिवसानंतर रास्ता रोको केला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.









