प्रतिनिधी/ बेळगाव
मर्कंटाईल सोसायटीतर्फे मराठा मंदिर येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून गोगटे उद्योग समुहाच्या मंगल गोगटे उपस्थित होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. अंजली जोशी उपस्थित होत्या. प्रारंभी सोसायटीच्या सदस्य महिलांनी स्वागतगीत सादर केले. मंगल गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार मनीषा सुभेदार, उद्योजक प्रिती पाटील, योशिता आजगावकर, आशा पत्रावळी यांचा त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मंगल गोगटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शारदा सावंत यांनी आसावरी भोकरे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी प्रिती पाटील यांनी महिला दिन कशासाठी? याबाबत विचार व्यक्त केले. योशिता यांनी आपला उद्योजकतेचा प्रवास कथन केला. मनीषा सुभेदार यांनी स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीचे भान कसे ठेवावे, याबद्दल मत व्यक्त केले. सोसायटीचे चेअरमन संजय मोरे यांनी स्वागत करून सोसायटीच्या प्रगतीची माहिती दिली. सर्वांचा परिचय करून देऊन सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आसावरी भोकरे यांनी केले. यानंतर अंजली जोशी यांनी महिलांचे आरोग्य, पौगंडावस्थेतील मुलींच्या समस्या आदींवर स्लाईड शोच्या साहाय्याने माहिती दिली.









