श्रेयांका पाटील मालिकावीर, कनिका अहुजा सामनावीर
वृत्तसंस्था/ माँग कॉक (हाँगकाँग)
बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या इमर्जिंग आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रेयांका पाटील आणि मनत काश्यप यांच्या शानदार फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात बांगलादेशचा 31 धावांनी पराभव करून अजिंक्यपद हस्तगत केले. श्रेयांका पाटील मालिकावीर तर कनिका अहुजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या अंतिम सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत अ संघाने 20 षटकात 7 बाद 127 धावा जमवत बांगलादेश अ संघाला विजयासाठी 128 धावांचे आव्हान दिले. बांगलादेश अ संघाचा डाव 19.2 षटकात 96 धावात आटोपला.
भारत अ संघाच्या डावामध्ये कनिका अहुजाने 23 चेंडूत 4 चौकारासह 30, दिनेश वृंदाने 29 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 36, कर्णधार श्वेता सेरावतने 20 चेंडूत 2 चौकारासह 13, छेत्रीने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 22, त्रिशाने 11 चेंडूत 4 तर सौम्या तिवारीने 3, के. गौतमने 2 तसेच तितास साधूने 1 चौकारासह नाबाद 8 धावा जमवल्या. कर्णधार शेरावत आणि छेत्री यांनी सलामीच्या गड्यासाठी 28 धावांची भर घातली. भारत अ संघाच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. भारताला अवांतराच्या रुपात 9 धावा मिळाल्या. बांगलादेश अ तर्फे सुलताना खातूनने 2, तसेच नाहिदा अख्तरने 2 व रिबा खानने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रेयांका पाटील आणि मनत काश्यप यांच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेश अ संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. त्यांच्या केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. शोभना मोसटेरीने 22 चेंडूत 2 चौकारासह 16, नाहिदा अख्तरने 22 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 17 तसेच एस. राणीने 11 चेंडूत 2 चौकारासह 13 धावा जमवल्या. भारत अ संघाच्या गोलंदाजांनी 14 वाईड आणि एक नोबॉल टाकल्याने बांगलादेश अ संघाला अवांतराच्या रुपात 16 धावा मिळाल्या. एस. अख्रतने 1 षटकारासह 9 धावा जमवल्या. बांगलादेशच्या डावात 1 षटकार आणि 7 चौकार नोंदवले गेले. भारतातर्फे श्रेयांका पाटीलने आपल्या चार षटकात 13 धावात 4 तर मनत काश्यपने 20 धावात 3, कनिका अहुजाने 23 धावात 2 आणि साधूने 14 धावात एक गडी बाद केला. या स्पर्धेमध्ये पावसाचा अडथळा वारंवार आल्याने भारत अ संघाचे 3 सामने वाया गेले. त्यामध्ये लंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्याचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये एकूण 8 सामने पावसामुळे रद्द करावे लागले.
संक्षिप्त धावफलक : भारत अ 20 षटकात 7 बाद 127 (कनिका अहुजा 23 चेंडूत 4 चौकारासह 30, दिनेश वृंदा 29 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 36, छेत्री 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 22, श्वेता शेरावत 20 चेंडूत 2 चौकारासह 13, अवांतर 9, नाहिदा अख्तर 2-13, एस. खातून 2-30, सजिदा अख्तर मेगला 1-26, रबिया खान 1-14), बांगलादेश अ 19.2 षटकात सर्वबाद 96 (नाहिदा अख्तर 1 चौकारासह नाबाद 17, शोभना मोसटेरी 22 चेंडूत 2 चौकारासह 16, एस. राणी 2 चौकारासह 13, अवांतर 16, श्रेयांका पाटील 4-13, मनत काश्यप 3-20, कनिका अहुजा 2-23, टी. साधू 1-14).









