बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांना उत्तर मतदार संघातून भरघोस प्रतिसाद मिळू लागला आहे. सोमवारी विविध महिला मंडळांनी उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. कपिलेश्वर रोड, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, तानाजी गल्ली येथील महिलांनी एकत्रित येत आपला पाठिंबा म. ए. समितीला जाहीर केला. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी नगरसेविका वैशाली हुलजी, रेणू मुतगेकर यांनी महिला मंडळांच्या भेटी घेत म. ए. समितीसोबत राहण्याचे आवाहन महिलांना केले. मंगळवारी होणाऱ्या प्रचारफेरीत व कॉर्नर सभेमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होतील, असा निर्धार करण्यात आला.
आज टिळकचौक येथे कॉर्नर सभा
अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. 25 रोजी रात्री 8 वाजता टिळक चौक येथे कॉर्नर सभा होणार आहे. या सभेवेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.









